नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून, शिवसेनेत अंतर्गत दुफळी पडण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादरोडवरील एका लॉन्सवर शिवाजी चुंबळे, परवेज कोकणी यांच्या समवेतच्या बैठकीस सेनेच्या माजी आमदारासह खासदार उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.तर दुसरीकडे भाजपाचे स्वतंत्र पॅनल करण्यासाठी धडपड करणारे नगरसेवक दिनकर पाटील यांनी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासोबत शनिवारी बैठक असल्याचा दावा केल्याने शिवसेना नेमकी राष्ट्रवादीसोबत की भाजपासोबत, असा प्रश्न चर्चिला जात आहे. तिकडे दिनकर पाटील यांनी शुक्रवारी (दि. १२) सायंकाळीच भाजपा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची समर्थकांसह भेट घेऊन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी स्वतंत्र पॅनल निर्मितीबाबत चर्चा केली. तसेच या चर्चेत शिवसेनेचे काही पदाधिकारीहीभाजपा पॅनलसोबत राहणार असल्याचे खासदार चव्हाण यांना पाटील यांनी सांगितल्याचे कळते. विशेष म्हणजे, दिनकर पाटील खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना भेटून गेल्यानंतर लगेचच काही वेळात माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने खासदार चव्हाण यांची मदत नेमकी कोणाला होणार याबाबतही चर्चा सुरू आहे. कारण, नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅँक निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे व देवीदास पिंगळे यांच्या गटाकडून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी निवडणूक लढवून विजयश्री मिळवली आहे.गेल्या काही वर्षांपासून बाजार समितीवर देवीदास पिंगळे यांचे निर्विवाद वर्चस्व असले, तरी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचार तसेच आर्थिक अनियमितता या कारणांवरून निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
बाजार समितीवरून सेनेत दुफळी?
By admin | Published: June 12, 2015 11:46 PM