बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून दररोजचे शेतमाल बाजारभाव समजणार आहे. शनिवारी सभापती देवीदास पिंगळे यांच्या हस्ते ॲपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसभापती रवींद्र भोये, श्याम गावित, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, संपत सकाळे, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, संजय तुंगार, भाऊसाहेब खांडबहाले, संदीप पाटील, चंद्रकांत निकम, प्रवीण नागरे, विनायक माळेकर व ॲपची निर्मिती करणारे स्टॅटिक जीएसएमचे संचालक गौरव मुंगसे उपस्थित होते.
बाजार समितीत शेतमाल विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांची बाजार समिती बाहेर फसवणूक होऊ नये, यासाठी ॲप निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीत शेतमाल बाजारभाव दोन सत्रात प्रसिद्ध केला जाईल. त्यातून शेतमालाच्या बाजार भावाची माहिती मिळेल. नियमनमुक्तीने व्यापारी शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करत आहे. बाजारात शेतमालाला काय भाव मिळाला, हे शेतकऱ्याला माहिती नसते. त्यामुळे आलेला व्यापारी बेभाव शेतमाल खरेदी करतो. परिणामी, शेतकऱ्याचे नुकसान होते.
बाजार समितीत शेतकऱ्यास अडचण आल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधला आणि काही प्रतिसाद किंवा वेळीच मदत मिळत नसल्यास शेतकरी ॲपच्या माध्यमातून डायरेक्ट कनेक्ट टू सभापती, संचालक मंडळ असे नियोजन केले आहे. जेणेकरून अडचणी तात्काळ सोडवून शेतकऱ्यास प्रतिसाद न देणाऱ्या कर्मचाऱ्याची तक्रार करता येईल.
इन्फो बॉक्स---
शेतकऱ्याला करता येणार तक्रार
बाजार समितीत शेतकऱ्यास लिलाव प्रक्रियेदरम्यान, व्यापारी, अडते, हमाल यांच्याकडून अडचण भासल्यास संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी ॲपद्वारे तक्रार करता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी ॲप विनामूल्य दिले जाणार असून ॲप सदस्य नोंदणी प्रक्रिया अगदी सोपी आहे. ॲण्ड्रॉइड मोबाइल प्लेस्टोरमध्ये प्रवेश करत ‘नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती’ असे नाव टाकल्यास ॲप ओपन होईल. त्यानंतर डाऊनलोड करून मोबाइलमध्ये इंस्टॉल करता येईल.http://bit.ly/apmcnsk लिंक एकदा क्लिक करत ॲप इंस्टॉल करता येईल.