नाशिक :इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) येत्या रविवारी (दि.१०) शहर व परिसरासह जिल्ह्यात साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहराची बाजारपेठ सजली आहे. घरे, दुकानांसह आपापला परिसर सजविण्याची लगबग मुस्लीम बहुल भागात पहावयास मिळत आहे. मशिदींवर करण्यात आलेल्या रोषणाईने नूर पालटला आहे.दरवर्षी उर्दू महिना ‘रबीउल अव्वल’च्या ११ तारखेला ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. यावर्षीदेखील मिलादची जय्यत तयारी जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, देवळालीगाव, विहितगाव, देवळाली कॅम्प परिसरात पहावयास मिळत आहे. या भागात सजावट साहित्य विक्रीचे विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. हिरवे झेंडे, पताका, चमकी, विद्युत रोषणाईच्या माळा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सजावट साहित्यांना मागील चार दिवसांपासून मागणी वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नागरिकांकडून घरे, दुकाने सजविण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच विविध युवक मित्रमंडळांकडून आपापला परिसर सजविण्यासदेखील प्राधान्य दिले जात आहे. परिसर सजविताना रस्त्याच्या दुतर्फा झेंडे लावण्यात येत आहेत. तसेच रोषणाईसाठी मंडप उभारणीवर भर दिला जात आहे. जुने नाशिक, वडाळागाव, देवळाली कॅम्प, नाशिकरोड या भागात गल्ली-बोळात मिलादच्या तयारीने वेग घेतला आहे. सजावट करण्यासह विविध प्रकारचे आकर्षक देखावे उभारणीचेही नियोजन सामाजिक सांस्कृतिक मित्रमंडळांकडून केले जात आहे. देखावे उभारताना किंवा स्वागत कमानी, फलक लावताना कु ठल्याही प्रकारे रहदारीला अडथळा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन विविध मशिदींमधून धर्मगुरूंकडून करण्यात आले आहे.‘जुलूस-ए-मुहम्मदी’चे नियोजनजुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड या भागातून सालाबादप्रमाणे पारंपरिक पध्दतीने पैगंबर जयंतीनिमित्त येत्या रविवारी मिरवणुकांचे (जुलूस) आयोजन करण्यात आले आहे. वडाळागावातून जामा गौसिया मशिदीपासून सकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच नाशिकरोडमधूनही सकाळच्या सुमारास जुलूस निघणार आहे. मुख्य ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ जुने नाशिकमधून रविवारी दुपारी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात येणार आहे.