मालेगाव : राज्यातील सध्याची शिक्षणव्यवस्था व शिक्षक मोडीत काढून केवळ शिक्षणाचे व्यापारीकरण बाजारीकरण करण्याचे काम भाजपा सरकार करते आहे, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केले. येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात शिक्षक भारतीच्या वतीने नाशिक विभागीय मेळावा घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पाटील बोलत होते. शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, नाना बोरस्ते राज्याध्यक्ष नवनाथ गेंद, भरत शेलार, दिनेश खोसे, राजेंद्र लोंढे, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती अनिल तेजा आदी उपस्थित होते. राज्यमंत्री भुसे म्हणाले, शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून आमदार कपिल पाटील सभागृहात असावे, अशी सर्वांची भावना आहे. शिक्षकांच्या प्रश्नाबाबत लवकरच शिक्षण सचिवांच्या समवेत बैठक लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रारंभी भरत शेलार यांनी प्रास्ताविक केले. यानिमित्ताने नाशिक विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन के. के. अहिरे यांनी केले. मेळाव्यास शहर व तालुक्यासह धुळे, जळगाव, नगर येथील मोठ्या संख्येने प्राथमिक माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सध्याच्या राज्यकर्त्यांना कान राहिलेले नाहीत. त्यामुळे हे सरकार शिक्षकांच्या समस्यांबाबत काहीही ऐकायला तयार नाही. राज्यातील विद्यमान शाळा मोडून काढणे व शिक्षकांना बदनाम करणे हा उद्योग शिक्षणमंत्री तावडे करीत आहेत. स्वयंअर्थसाह्य शाळांचे विधेयक आणले असून, आपल्या शाळा बंद करून आता कंपन्याना शाळा काढण्यास सरकार परवानगी देते आहे़ -कपिल पाटील,आमदार
राज्य सरकारकडून शिक्षणाचे बाजारीकरण : कपिल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 1:10 AM