सिन्नर : सलग तीन वर्षांपासून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागावर वरुणराजा रुसल्याने या परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. दुष्काळ व महागाईचा विपरीत परिणाम पूर्व भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वावीच्या आठवडे बाजारावर दिसून आला. पोळा सणाला बैलांसाठी साहित्य विक्रीसाठी घेऊन आलेल्या व्यावसायिकांची यामुळे घोर निराशा झाली. बाजारात बैलपोळ्याचे साहित्य भरमसाठ प्रमाणात उपलब्ध होते; मात्र बळीराजाने त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.सिन्नर तालुका अवर्षणग्रस्त असला तरी कष्टाळू व पशुप्रेमी शेतकऱ्यांनी मोठ्या दुष्काळातही आपले पशुधन सांभाळले आहे. आपल्या बैलांवर जिवापाड प्रेम करणारा बळीराजा मात्र सलगच्या तीन वर्षांपासून पडणाºया दुष्काळामुळे पुरता खचला असल्याचे दिसून आले. यामुळे बैलपोळ्याच्या बाजारात गर्दी दिसत होती; मात्र बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीवर विपरीत परिणाम दिसून येत होता.चारा व पाणीटंचाईमुळे अनेकांनी आपल्याजवळील बैलजोड्या कमी केल्या आहेत. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. बाजारात बैलांचे साहित्य खरेदी करण्याऐवजी काही शेतकरी मातीचे बैल खरेदी करताना दिसून येत होते. घरी बैलजोडी नसल्याने अनेक शेतकºयांना मातीच्या बैलांचे पूजन करून वृषभोत्सव साजरा करावा लागणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पोळ्याचा मोठा बाजार म्हणून वावीचा असणारा नावलौकिक दुष्काळ व महागाईमुळे कमी होऊ लागला आहे. बाजारात दरवर्षीप्रमाणे साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती, शेतकरीही आले होते; मात्र बैलांचे सजावटीचे साहित्य पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाले नाही.बडा घर, पोकळ वासावावी येथील पोळ्याचा आठवडे बाजार तालुक्यातच नव्हे तरजिल्ह्यात मोठा मानला जातो. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील५० ते ६० गावातील शेतकरी या बाजारात बैलपोळ्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे गावभर आठवडे बाजार विखुरला जातो. पोळ्याचे साहित्य विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली जाते. या रांगेत केवळ बैलपोळ्याचे साहित्य विक्रीसाठी ठेवले जाते. खरेदीसाठी हजारो शेतकरी येत असल्याने साहित्य विक्रीसाठी जिह्यातीलच नव्हे तर राज्यभरातून दुकानदार येत असतात. सिन्नरसह कोपरगाव, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, वैजापूर, परळीवैजनाथ, बीड, औरंगाबाद आदींसह अन्य शहरातील दुकानदारांनी साहित्य विक्रीसाठी वावीच्या आठवडे बाजारात गर्दी केली होती. यावर्षी दुष्काळामुळे मात्र त्यांचा म्हणावा असा व्यवसाय झाला नाही. त्यामुळे त्यांना निराश होऊन परतावे लागले. बाजार मोठा असला तरी त्याची अवस्थामोठे घर, पोकळ वासा अशी झाली.बैलांच्या अंघोळीसाठी पाण्याचा प्रश्नसलग तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. यावर्षीही वरुणराजाने सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागावर वक्रदृष्टी केल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांतील वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची वाट पाहावी लागते.