नाशिक : हिंदू पंचांगानुसार सध्या पितृपक्ष सुरू असल्याने नेहमी गजबजलेली शहरातील बाजारपेठ पितृपक्षामुळे थंडावलेली आहे. नवीन घर, दागदागिने, वाहन खरेदीवरही त्याचा परिणाम दिसतो आहे. नवरात्रीत पहिल्या दिवसापासूनच मोठ्या वस्तूंच्या खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याने सर्वपित्री अमावास्यानंतर बाजारातील मंदिचे सावट दूर होऊन नवचैतन्य निर्माण होण्याचा व्यापाऱ्यांना विश्वास आहे. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. त्यामुळे या दिवसात नवीन गोष्टींना सुरु वात केली जात नाही. अनेक जण या दिवसांमध्ये प्रवास करणे किंवा नवीन खरेदी करण्याला टाळतात. यामुळे याचा फटका बाजाराला बसत असून नेहमी गर्दीने गजबजलेल्या बाजारातील दुकानांत सध्या शांततेचे वातावरण आहे. परंतु नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने हे चित्र लवकरच पालटणार असून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून बाजारात गर्दी होण्याची शक्यता आहे. पितृपक्षामुळे महिलांनी अजूनही खरेदीला सुरु वात केली नाही. याचा थेट परिणाम दुकानदारांवर होत आहे. मात्र सर्वपित्री अमावास्येनंतर दुसऱ्याच दिवशी घटस्थापना होणार असल्याने बाजारपेठेत मोठा बदल पहायला मिळणे अपेक्षित असून बाजारात अचानक नवचैतन्य निर्माण होईल, अशी आशा विविध व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
पितृपक्षात बाजारपेठ थंडावली
By admin | Published: September 28, 2016 11:25 PM