- संजय दुनबळे, (नाशिक )
मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मक्याच्या भावात शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी मक्याला १५७० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बाजार समित्यांमध्ये कडधान्यांची आवक कमी असून, त्यांचे भाव स्थिर आहेत. भुईमूग शेंगांना चांगला भाव मिळत आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह विंचूर उपबाजारातही मक्याची आवक वाढली आहे. विंचूर उपबाजार आवारात दररोज तीन ते चार हजार क्विं टल मक्याची आवक होत असून, येथे मक्याला १५५५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. गेल्या सोमवारी तर विंचूरला मक्याचा भाव सोळाशे रुपये क्विंटलपर्यंत गेला होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गव्हाच्या भावातही सुधारणा झाली असून, लासलगावी गव्हाला १९५१ पासून २८१७ रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. रबी हंगामात गव्हाचा पेरा कमी असल्याने भविष्यात गव्हाचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गुजरातमधील कापड उद्योग आणि पोल्ट्री उद्योगाकडून मक्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या मका भाव तेजीत असल्याचे नांदगाव बाजार समितीचे सचिव पंडित खैरनार यांनी सांगितले. या बाजार समितीत दररोज सुमारे ४०० ट्रॅक्टर ट्रॉली मक्याची आवक होत असून १५७० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. नांदगाव बाजार समितीत बाजरीला १८०० पासून २२५० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. गव्हाची आवक कमी असल्याने गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. नांदगावला बुधवारी भुईमूग शेंगाला ६३०० रुपये क्ंिवटलचा भाव मिळाला. इतर कडधान्यांचे भाव स्थिर असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
मालेगाव बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात मक्याची आवक होत आहे. येथे मक्याला १४७५ ते १५६० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. मालेगावी बाजरीची आवक चांगली असून, साधारणत: २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बाजरी विकली जात आहे. कडधान्यामध्ये हरभऱ्याला ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत असून, इतर कडधान्यांचे भाव स्थिर असल्याचे भुसार मालाच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.
यावर्षी नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे मक्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे बाजारात मक्याची आवक असली तरी ती दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. मक्याला मागणी मात्र चांगली असल्याने यावर्षी मक्याचे भाव तेजीत आहेत. राज्यभरात माथाडी कामगारांनी पुकारलेल्या लाक्षणिक संपाचा जिल्ह्यातील बाजार समित्यांना चांगलाच फटका बसला. संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. किमान दोन दिवस याचा चांगला प्रभाव जाणवला. त्यानंतर पुन्हा बाजारपेठेतील व्यवहार व कामकाज सुरळीत झाले आहे. भुसार मालाने शेतकऱ्यांना यावर्षी दिलासा दिला आहे.