कोरोना विषाणूंचा गर्दीत संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी निर्बंध लादले आहे. त्यात आठवडे बाजारावरदेखील बंदी घालण्यात आली आहे, असे असले तरी बुधवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी नियम डावलून काही भाजीपाला विक्रेत्यांनी गणेशवाडी भाजीमंडईसमोर असलेल्या रस्त्यावर तसेच मरीमाता झोपडपट्टीसमोर आणि गौरी पटांगणात भाजीबाजार भरविला होता.
सकाळी मनपाच्या पथकाने बाजारात विक्रेत्यांना कोरोनामुळे भाजीबाजार बसवू नका अशा सूचना दिल्या होत्या, मात्र तरीदेखील दुपारी तीन वाजेनंतर काही विक्रेत्यांनी दुकाने थाटली असल्याचे निदर्शनास येताच विभागीय अधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक भूषण देशमुख यांच्या पथकाने बाजारात चारचाकी वाहन फिरवून त्याद्वारे विक्रेत्यांना आवाहन करत बाजार उठविला. मनपाचे वाहन भाजीबाजारात येताच भाजीपाला तसेच अन्य वस्तू विक्रेत्यांची काहीकाळ पळापळ झाल्याचे चित्र दिसून आले.