नाशिक : कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा यांसह अनेक मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी गुरुवारपासून संपावर गेले आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजारपेठेत दैनंदिन व्यवहारांवर परिणाम जाणवू लागला आहे. बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव तेजीकडे झुकले असून, दूधपुरवठा प्रभावित झाला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतमालाची वाहतूकही ठप्प झाली असून, अगामी काळात संपाची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे.लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी तसेच विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे भाजीबाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव दुप्पट झाले आहेत. बाजारभाव वाढल्याने ऐरवी किलो-दोन किलो भाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी आता थेट पावशेर, अर्धा किलो भाजीपाला खरेदी करण्यावर भर दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होऊ लागला आहे. गंगाघाट परिसरात किरकोळ भाजीविक्रेत्यांनी शेतकरी संपावर जाणार असल्याने दोन दिवस अगोदरच भाजीपाल्याचा साठा करून ठेवला आहे. बाजारात सध्या कांदापात, मेथी, पालक, कोथिंबीर या पालेभाज्या, तर टमाटा, दोडका, गिलके, काकडी, कारली, दुधी भोपळा, वांगी, मिरची, गवार, फ्लॉवर या फळभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहे, मात्र दोन दिवसांपूर्वी दहा रुपये पावशेर दराने विक्री होणाऱ्या फळभाज्या आता थेट २० रुपये पावशेर म्हणजे ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ज्यांच्याकडे पालेभाज्या आहेत ते पालेभाज्यांची जुडी ४० रुपये दराने विक्री करीत आहेत. भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी कोणताही भाजीपाला घ्या ८० रुपये किलो असेच भाजीविक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी संप आणखी तीव्र केला तर साठवणूक केलेला भाजीपाला संपून भाजीपाल्याची कृत्रिम टंचाई निर्माण होऊन पालेभाज्यांचे बाजारभाव शंभरी गाठण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही फळभाज्या घेतल्या तर ग्राहकांना किलोभर भाजीपाल्यासाठी किमान ८० रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहक खिशाचा विचार करून सध्या तरी पावशेर भाजीपाला खरेदी करण्यावर भर देत आहे.
बाजारपेठेवर परिणाम
By admin | Published: June 03, 2017 12:23 AM