नाशिक : गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना निर्बंधात असलेले नाशिककर आता बऱ्यापैकी मुक्त झाले असल्याने जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. असे असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे अपेक्षित असल्याचे आवाहन प्रशासनाकडून केेले जात आहे. कोरोनाचे संकट कमी झालेले नसल्याने शिवाय तिसऱ्या लाटेबाबतची शक्यतादेखील असल्यामुळे खबरदारी म्हणून सिद्धपिंप्री गावाने खबरदारी घेतली आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस बाजारपेठ बंद ठेवली जात आहे.
कोरोना काळात असलेल्या निर्बंधांचे पालन करीत सिद्धपिंप्री गावातील व्यावसायिकांनी दुकानांच्या वेळांचे पालन करीत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. याशिवाय वीकेंड लॉकडाऊनचेही सर्व नियम पाळण्यात आलेले आहेत. आता अर्थचक्र सुरळीत सुरू झालेले असले तरीही येथील व्यवहार एक दिवस स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले जात आहेत. गर्दीला आळा बसावा आणि त्यानिमित्ताने नागरिकांमध्येही कोरोनाविषयीची जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दर शनिवारी येथील बाजारपेठ बंद ठेवली जात आहे.
गावातील चौकात मोठी बाजारपेठ असून, या ठिकाणी सर्व प्रकारची दुकाने आहेत. ओझर, भगूर, आडगावला जोडणारे रस्ते असल्यामुळे या मार्गावरील वर्दळ वाढलेली असल्याने व्यापाराला चांगली संधी आहे. शेती व्यापारही मोठ्या प्रमाणात बहरलेला असल्याने या गावात नेहमीच रेलचेल असते. असे असले तरीही व्यापाऱ्यांनी एक दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबाजवणी केली जात आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून सज्जतादेखील केली जात आहे. प्रशासकीय पातळीवर असलेल्या तयारीच्या बरोबरीने नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा शासनाकडून वारंवार केली जात आहे. कोरोनाची काळजी घेण्याबरोबरच अर्थचक्र सुरळीत सुरू राहावे, यासाठी निर्बंधातून काही प्रमाणात मुक्तता करण्यात आलेली आहे. परंतु वाढणारी गर्दी शासनाला चिंतेत टाकणारी आहे. गर्दी वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागू शकतो, असा इशारा राज्य शासनाकडून देण्यात आला आहे.
--कोट--
कोरोनाचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाही. गावातही काही रुग्ण आढळलेले आहेत. तिसऱ्या लाटेचीदेखील चर्चा आहे. त्यामुळे सुरक्षितता हाच उपाय असल्याने गर्दीला आळा घालण्यासाठी बाजारपेठा आठवड्यातून एकदा बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
-- मधुकर ढिकले, सरपंच, सिद्धपिंप्री.(फोटो)
050921\393705nsk_14_05092021_13.jpg
सिद्धपिप्री येथील बंद असलेली बाजारपेठ