नाशिक : आॅनलाइन खरेदी-विक्रीची प्रक्रिया, मोठमोठ्या मॉलमधून विविध दैनंदिन गरजेच्या लोकोपयोगी वस्तूंच्या होणाऱ्या घाऊक व किरकोळ विक्रीमुळे किरकोळ व्यापार अडचणीत सापडला आहे. यामुळे व्यापारावर होणाºया परिणामांवर चर्चा करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात बुधवारी (दि. २६) बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत येत्या शुक्रवारी (दि.२८) भारत व्यापार बंदला नाशिकमधील व्यापारी संघटना पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मॉल व आॅनलाइन बाजार संस्कृतीला संघटितपणे विरोध करण्यासाठी शुक्रवारी भारत व्यापार बंदला शहरातील सर्व व्यापारी पाठिंबा देत कडकडीत बंद पाळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राठी सभागृहात चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, राजेश मालपुरे, भावेश मानेक उपस्थित होते. शुक्रवारी चांदीच्या गणपतीची आरती करून सर्व व्यापारी बंदमध्ये सहभागी होणार आहे. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. भारत व्यापार बंदला महाराष्ट्र चेंबरचा पाठिंबा असल्याचे मंडलेचा यावेळी म्हणाले. चेंबर व्यापाºयांच्या पाठीशी आहे.बुधवारी (दि.१९) मुंबईला महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत भारत व्यापार बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नाशिक किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेखर दशपुते, नाशिक मोटार मर्चंटचे अध्यक्ष चढ्ढा, हार्डवेअर मर्चंटचे संतोष लोढा, प्लायवुड मर्चंटचे हसमुख पोकार, नाशिक मोटार मर्चंटचे सुरेश चावला आदींसह विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी चर्चेत सहभाग घेत मते मांडली. संपूर्ण नाशिक बंद ठेवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सर्व व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून भारत व्यापार बंद आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शुक्रवारी बाजारपेठ होणार ठप्प ; बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 1:17 AM