नाशिक : वधू-वर शासकीय अधिकारी... मग ते लग्नही तसेच धडाकेबाज, अशी कल्पना केली जाणे स्वाभाविक आहे. शहरातही असेच एक जोडपे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विवाहबंधनात अडकले; मात्र त्यांचा विवाह हा आगळावेगळा सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला. वधू-वरासह व-हाडी मंडळींनी लग्न मांडवातच अवयवदानाचा संकल्प सोडला अन् रक्तदान करत लग्नाचा आहेर दिला.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अभिनव विवाहाच्या निमंत्रणाची चित्रफित चांगलीच गाजली. या चित्रफितीतून भविष्यनिर्वाहनिधी विभागाचे सहायक आयुक्त वधू वर्षा पगार, तर आयकर विभागाचे सहायक आयुक्त वर स्वप्नील कोठावदे यांनी पर्यावरण, रक्तदान, अवयवदानाची शपथ घेऊया...अन् हाच असेल आमच्या लग्नाचा आहेर, असे आगळे आमंत्रणच दिले होते. या दोघा अधिकाऱ्यांचा विवाह मोठ्या उत्साहात रविवारी (दि.१८) बोधलेनगर परिसरातील एका लॉन्समध्ये पार पडला.दरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे जोडपे विवाहबद्ध झाले. नव वधू-वर यांनीही अवयवदानाचा अर्ज भरत रक्तदान के ले. तसेच विवाहासाठी जमलेल्या व-हाडींपैकी अनेकांनी अवयवदानाचा संकल्प सोडत अर्जही भरले. यावेळी बहुतांश पाहुण्यांनी विवाह मांडवातच रक्तदान करत वधू-वरांच्या सामाजिक बांधिलकीच्या हाकेला प्रतिसाद दिला. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने यावेळी अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले तसेच रक्तसंकलनही करण्यात आले.
लग्न मांडवातच अवयवदानाचा संकल्प सोडला अन् रक्तदानही केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 8:44 PM
वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने यावेळी अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले तसेच रक्तसंकलनही करण्यात आले.
ठळक मुद्देरक्तदानाने सहजीवनाला प्रारंभसर्वप्रकारच्या कर्मकांडांना फाटा दिला.