त्र्यंबकेश्वर : चार वर्षांपूर्वी प्रेमसंबंधातून खून झालेल्या सातपूरच्या महिलेच्या खुनाला वाचा फुटली असून, या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात प्रवीण ऊर्फ सोनू भास्कर भालेराव या संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालेराव यास अटक करून नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. ढवळे यांनी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबई गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीत महिलेच्या हाडांचा सांगाडा पोलिसांना सापडला आहे. भगवान बन्सी तालखे (रा. गणेशगाव नाशिक) व ज्योती भगवान तालखे (३२) हे जोडपे सातपूर येथे वास्तव्यास होते. त्यांना तीन मुले आहेत. त्याच परिसरात प्रवीण ऊर्फ सोनू हाही राहायला होता. कामाच्या निमित्तने सोनू याचे भगवान तलाखे यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. त्यानंतर भगवान तलाखे यांच्या पत्नीशी सोनू याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. भगवान तालखे हे खासगी कंपनीत सुपरवायझर पदावर कार्यरत आहेत. त्यानंतर ती विवाहिता सोनू या प्रियकरासोबत मुले घरी टाकून पळून गेली. त्यावेळी सप्टेंबर २०१२ मध्ये भगवान तालखे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात पत्नी हरविल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान ती विवाहिता पुन्हा पतीकडे आली. परंतु पतीने स्वीकार करण्यापूर्वीच तिने पतीकडे राहण्यास नकार देत भावाकडे जात असल्याचे सांगितले. मात्र ती पुन्हा अंबई येथे प्रियकराकडे गेली. नातेवाइकांना तिचे प्रियकरासोबत राहणे पसंत नसल्यामुळे सदर विवाहिता काही दिवस नातेवाइकाकडे आणि काही दिवस प्रियकराकडे वास्तव्यास राहू लागली. दरम्यान ती अचानक दिसेनासी झाली. ती प्रियकरासोबत राहात असावी असा नातेवाईकांचा समज होता. परंतु पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर तिच्या खुनाला वाचा फुटली. संशयावरून सोनू भालेराव यास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी ताब्यात घेवून त्याला विश्वासात घेत विचारपूस केली. तिला कोठे पुरून ठेवले असे विचारले असता संशयित सोनू याने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, जिल्हा रुग्णालयाचे फोरॅन्सीक तज्ज्ञ डॉ. आनंद पवार, मेरीतील फॉरेन्सीक लॅबच्या तज्ज्ञ श्रीमती खैरनार, त्र्यंबकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम, पोलीस हवालदार रमेश पाटील, प्रकाश गवळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजगुरू यांना घटनास्थळी नेले. संशयिताने विवाहितेचे प्रेत ज्याठिकाणी पुरले ती जागा दाखविली. (वार्ताहर)
प्रेमसंबंधातून विवाहितेचा खून
By admin | Published: May 09, 2016 11:50 PM