मालेगाव : शहरातील शब्बीरनगर भागातील मणियार समाजातील वऱ्हाडी मंडळी ताज लक्झरी बसने गुजरातला गेले; परंतु रस्त्यात झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले; मात्र तरीही दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात ‘निकाह’ पार पाडण्यात आला.
शब्बीरनगरमधील हाजी शेख अहेमद शेख भिकन यांचा मुलगा मुद्दस्सीर शेख याचा विवाह सूरतच्या शेख खलील गनी मणियार यांची मुलगी सुमैय्याबी हिचे बरोबर ठरला होता. लग्नापूर्वीचे सवर विधी आटोपून साधेपणाने विवाह करण्याचे ठरले. त्यानुसार शब्बीरनगरमधील गल्लीतील शेजारी कुणालाही बरोबर नेले नाही. केवळ पिलखोड आणि धुळे येथील निवडक नातलगांना घेऊन एका ट्रॅव्हल्स्मधून ‘वऱ्हाडी’ सूरतला जात होते. रस्त्यात झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले, तर सातजण जखमी झाले. नववधूच्या घरी अपघाताचे वृत्त कळताच शोककळा पसरली. जखमींना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले. घरातील ज्येष्ठ मंडळींनी तशातच साधेपणाने विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुद्दशीर आणि सुम्मैया यांचा निकाह लावण्यात आला. यावेळी मात्र वऱ्हाडासह दोन्ही बाजूंच्या नातलगांनी हंबरडा फोडला. हाजी अहमद शेख यांचे शब्बीर नगरात जिलेबी, भजीचे हॉटेल आहे. त्यांना तीन मुले असून, तिन्ही मुले रिक्षा चालवितात. घरात पहिलेच लग्न असल्याने आनंदाचे वातावरण होते. पहाटे एक वाजता वऱ्हाड सूरतच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, ‘वऱ्हाडी’च्या नशिबी काय लिहिले आहे याची त्यांना कल्पना नव्हती. परंतु नियतीने अखेर घाला घातलाच.
इन्फेो;
कारागीर हॉटेलवरच
शब्बीर नगरातील हाजी अहमद यांच्या हॉटेलवर गेल्या अनेक वर्षांपासून कारागीर काम करीत आहे; मात्र त्यांनाही नेण्यात आले नव्हते. तो आज हॉटेल सांभाळत असताना त्याला ‘अपघाता’ची खबर मिळाली. तोही धाय मोकलून रडू लागला. दुपारी घराजवळ गर्दी जमायला सुरुवात झाली अन् सर्व सूरतला फोन लावून हालहवाल विचारत असल्याचे दिसून आले.