सिन्नर : तालुक्यातील निमगाव-देवपूर येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली आहे.नंदिनी प्रदीप जगताप (२४) रा. निमगाव - देवपूर या विवाहितेने शुक्रवारी (दि. १) दुपारी १ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहितेची आई विठाबाई दिवे, रा. रामाचे पिंपळस, ता. निफाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरोधात तक्रार दिली. मयत मुलगी नंदिनी हीस सासरचे लोक ‘तू आम्हाला आवडत नाही’ या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ दमदाटी करून तिला उपाशीपोटी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मयत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीहून पोलिसांनी मयत विवाहितेचा पती प्रदीप रतन जगताप, सासू सुमनबाई रतन जगताप, सासरे रतन गणपत जगताप, भाया दीपक रतन जगताप व सुनंदा दीपक जगताप यांच्या विरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी.बी. आवारे अधिक तपास करीत आहेत.
विवाहितेची आत्महत्या; पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:16 AM