नाशिक : नेपाळी कॉर्नरवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत लाभात साक्ष देण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दीपक खैरनार, ललित खैरनार, लंकेश खैरनार, शोएब अन्सारी व मोहम्मद अन्सारी यांची मंगळवारी (दि़१३) परिसरातून धिंड काढण्यात आली़ पोलिसांनी या संशयितांना भरचौकात उठबशा काढण्यास सांगून त्यांची दहशत मोडून काढली़२०१५ मध्ये कुरेशी व खैरनार यांच्यात नेपाळी कॉर्नरला वाद होऊन एकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी सुरू झाली आहे़ न्यायालयात साक्ष बदलण्याच्या कारणावरून शनिवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास या दोन गटांमध्ये जबर हाणामारीची घटना घडली होती़ यामध्ये लाठ्या-काठ्या व तलवारीचा वापर करण्यात आला होता़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, सोमवारी (दि.१२) त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दोन पथके तयार करून या संशयितांची दहशत असलेल्या गंजमाळ, शालिमार, नेहरू चौक, संत गाडगेबाबा पुतळा, मेनरोड या परिसरातून वरात काढली. संशयितांबाबत काही तक्रारी असल्यास त्या करण्याचेही आवाहन पोलिसांनी यावेळी केले. याप्रसंंगी भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल मुळे, सुनील कासर्ले, कर्मचारी सोमनाथ सातपुते, इजाज शेख, दीपक शिलावट, रवि माहिते आदी उपस्थित होते.
मारहाणीतील ‘भार्इं’च्या शालिमार चौकात उठबशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:33 AM