सटाणा : हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरहून चाळीस लाख रुपये आणले नाही म्हणून सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक जाचास कंटाळून मुल्हेर (ता. बागलाण) येथील २३ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी डॉक्टर पती व सासऱ्यासह पाच जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. अंतापूर येथील अनिल जाधव यांची मुलगी अश्विनी हिचा विवाह दि. २५ मार्च २०१६ रोजी मुल्हेर येथील डॉ. अशोक नामदेव क्षीरसागर यांचा मुलगा डॉ. मनोज याच्याशी झाला. लग्नापूर्वी मनोज हा एम.एस. झाला असून, तो शासकीय रुग्णालयात नोकरीला असल्याचे सांगून पंधरा लाख रुपये हुंडा घेतला होता. मात्र लग्नानंतर त्याची डिग्री व शासकीय नोकरीला असल्याचे खोटे निघाले. त्यांचे पितळ उघडे पडल्याने डॉ. मनोज, सासरे डॉ. अशोक, सासू सिंधूबाई क्षीरसागर या अश्विनीला मारहाण करून तिच्या चारित्र्यावर संशय घेत. वारंवार होणाऱ्या या जाचाने त्रस्त झालेल्या अश्विनीकडे नंतर हॉस्पिटलच्या बांधकामासाठी चाळीस लाख रुपयांच्या मागणीसाठी तगादा लावला होता. या त्रासामुळे अश्विनीच्या आईवडिलांनी थोडीफार मदत करू, असे सांगितले. या दरम्यान अश्विनी नाशिक येथे कोर्ससाठी बहिणीकडे आलेली असताना सासरच्या मंडळीने पुन्हा पैशांसाठी तगादा लावून मानसिक छळ सुरू केला होता. त्याला कंटाळून अश्विनीने आडगाव येथील वृंदावननगरमधील बजरंग रो-हाउसमध्ये बहीण लोपमुद्रा घरी नसताना ओढणीने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. दरम्यान, पोलिसांना अश्विनीच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी सापडली असून, या चिठ्ठीत मृत्यूस कारणीभूत सासरची मंडळीच असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती डॉ. मनोज क्षीरसागर, सासरा डॉ. अशोक नामदेव क्षीरसागर, सासू सिंधूबाई, दीर वीरेंद्र व नणंद संजीवनी अमोल नंदन यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या
By admin | Published: March 07, 2017 11:18 PM