सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मीरगाव येथील २५ वर्षीय विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी (दि.३) पहाटे घडली. याप्रकरणी आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू व दीर या तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैताली रमेश म्हस्के (२५ रा. मीरगाव ता. सिन्नर, नाशिक ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सासरच्या जाचाला कंटाळून चैताली हिने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची फिर्याद मयत विवाहितेचा भाऊ सागर बळीराम यादव (रा. नांदूर खुर्द, यादव मळा, राहाता) याने वावी पोलीस ठाण्यात दिली आहे. चैताली हिचा विवाह झाल्यानंतर तिला मुलगी व त्यानंतर मुलगा असे दोन अपत्य झाले. विवाहानंतर चार वर्षांनंतर चैताली हीस सासरच्या त्रास देण्यास सुरुवात केल्याची तक्रारीत म्हटले आहे. कोरोनाच्या काळात पती रमेश याची नोकरी गेल्यानंतर माहेरून पैसे आणावेत, यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास प्रारंभ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चैताली हीस मारहाण व उपाशी ठेवण्याचे प्रकार होत असल्याने तिने विषारी औषध सेवन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चैताली हिने बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केल्यानंतर तिला शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
इन्फो
काही काळ तणावाची स्थिती
विवाहितेच्या मृत्यूनंतर गुुरुवारी वातावरणात तणाव निर्माण झाला होता. वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शवविच्छेदन केल्यानंतर मीरगाव येथील वस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी विवाहितेचा पती रमेश मच्छिंद्र म्हस्के, सासू अलका व दीर सुधीर या तिघा संशयितांविरोधात विवाहितेचा छळ व आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक सागर कोते अधिक तपास करीत आहेत.