लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नातेवाइकांचे लग्न आटोपून पुन्हा पुण्याला जाणाऱ्या एका कुटुंबाला शिंदे गाव येथे गाडी ओव्हरटेक का केली? या कारणावरून एका टोळक्याने बेदम मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी झालेल्या झटापटीत १६ तोळे वजनाची सोनसाखळी व रुद्राक्षाची माळ कुठेतरी पडून गहाळ झाली. पुणे रहाटणी येथील सागर विलास पालवे व त्यांचे नातेवाईक सोमवारी निफाड तालुक्यातील पिंपळस येथे लग्नाला आले होते. लग्नकार्य आटोपून पालवे व त्यांचे नातेवाईक इनोव्हा गाडी (एमएच १४ बीसी २७८९) व दुसरी गाडी मारुती एसएक्स-४ (एमएच १४ बीएफ ८०००) या दोन गाड्यांमधून पुन्हा पुण्याला जाण्यास निघाले. नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गाव चौफुली येथे रात्री ११ वाजेच्या सुमारास वाहतुकीची कोंडी झालेली असताना इनोव्हा कारने एका पांढऱ्या मारुती कारला ओव्हरटेक केले. त्याचा राग आल्याने इंडिका गाडीतील चालक व त्याचा एक सहकारी हे शिवीगाळ करू लागले. सागर पालवे हा गाडीतून उतरून ईरटीका कार चालकास समजाविण्यास गेला असता त्या कारमधील दोघांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान याचवेळी पाठीमागून कोणीतरी दगडाने ईरटीका गाडीची काच फोडून सागरच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. सागरचे काका शैलेशकुमार, भाऊ कुणाल हे सोडवासोडवी करण्यास आले असता तेथे जमलेल्या ५-६ जणांनी सर्वांना मारहाण केली. काकू नीता पालवे यांच्या तोंडावर फाईट मारून जखमी केले. त्या ६ - ७ इसमांनी काका शैलेशकुमार यांना घेरून बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची १० तोळ्याची चैन व ६ तोळे वजनाची रुद्राक्षात घडवलेली माळ तुटून गहाळ झाली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाहून परतणाऱ्यांना मारहाण
By admin | Published: May 11, 2017 1:57 AM