घोटी : इगतपुरी तालुक्यात बिबट्या आदी जंगली प्राण्यांची हत्या करून त्या प्राण्यांच्या अवयवांची लाखो रु पयांना विक्र ी करणारी टोळी जेरबंद करण्यात इगतपुरीच्या वनखात्याला यश आले आहे. वनपरिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी बनावट ग्राहक बनून या टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच जणांना वन कायद्यानुसार अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना खेड मांजरगाव भागातील डोंगरात बिबट्याची कातडी, नखे, मिश्या विकणारी टोळी खरेदीदारांच्या शोधात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जाधव यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे आणि जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार गोरक्षनाथ जाधव वारंघुशी, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे बनावट ग्राहक बनून गेले. त्यांच्यासह वनविभागाचे संतोष बोडके, बी. व्ही. दिवे, एफ. झेड. सय्यद, विजय चौधरी, वनरक्षक रामा कोठुळे आदी उपस्थित होते. यावेळी वस्तूंची सौदा किंमत सहा लाख ठरवण्यात आली. बिबट्यांना मारूनच संबंधित वस्तू विक्री होत असल्याची खात्री झाल्याने त्यांनी आरोपी दिलीप शंभू पोकळे (२१), गोरख पोपट पोकळे (२०, दोघे रा. पोकळवाडी खेड), भाऊराव संतु भले (२५, रा. बारशिंगवे), सोमा लक्ष्मण मधे, रा. चिंचोडी, ता. अकोले, राजू चंदर पुंजारे (३५, रा. धारगाव, ह.मु. लोहशिंगवे), मारुती वाळू भले (२४, रा. बारशिंगवे) यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९९७२च्या कलम ९, ३९ (अ, ब), ५०, ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली. २० नखे, बिबट्याच्या मिश्या ताब्यात घेणे बाकी आहे. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता गुन्ह्यात सहकार्य करणारे इतर आरोपी आणि तपास करण्यासाठी त्यांना पाच दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव, वनरक्षक संतोष बोडके, बी.व्ही. दिवे, एफ. झेड. सय्यद, विजय चौधरी, वनरक्षक रामा कोठुळे हे अधिक तपास करीत आहेत.
बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 8:16 PM