अमृत उद्यानाला सावरकर यांचे नाव
नाशिक : पंचवटीतील तवली फाटा येथील अमृत उद्यानाचे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान असे नामकरण करण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्यासह परिसरातील नगरसेवकांनी यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर मांडला होता. त्यास मान्यता देण्यात आली आहे.
---
मखमलाबादजवळ पेालीस चौकीस जागा
नाशिक : पंचवटीतील प्रभाग क्रमांक ६ मधील ३० मीटर रुंदीच्या मखमलाबाद मार्गाजवळ मोकळ्या जागेत पोलीस चौकीसाठी जागा देण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे. यासंदर्भात उपमहापौर भिकुबाई बागुल यांनी महासभेत प्रस्ताव मांडला होता.
----
टीपी स्कीमचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे
नाशिक : मखमलाबाद शिवारातील टीपी स्कीमचा अंतिम प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर केला जाणार आहे. गेल्या ७ नोव्हेंबरपर्यंत या टीपी स्कीमच्या प्रारूपावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यांनतर आता त्याची छाननी करून यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठवण्यात येणार आहे.
----
अशासकीय सदस्य उरले नावापुरते
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग समित्यांमध्ये अशासकीय सदस्य नियुक्त करण्यात आले असले तरी त्यांना फार प्रभावीपणे कामकाज करता येत नसल्याची तक्रार आहे. गेले अनेक वर्षे अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जात नव्हती. मात्र सदस्य नियुक्त केल्यानंतर त्यांना फार प्रभावीपणे कामकाज करता येत नाही आणि प्रशासनदेखील त्यांची फार दखल घेत नाही.
---
शहरात पुन्हा वाढले जाहिरात फलक
नाशिक : शहरात राजकीय पक्षांच्या फलकांबरोबरच जाहिरात फलकांची संख्या वाढू लागली आहे. शासकीय कार्यालये तसेच मिळकतींवर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अशाप्रकारचे फलक लागत आहेत. महापालिकादेखील संबंधितांवर कारवाई करीत नसल्याने संबंधितांचे फावले आहे.
----
ब्लाइंड टर्न बंद करण्याची मागणी
नाशिक : महात्मानगर येथे सिक्स सिग्मा हॉस्पिटललगत कृषिनगरकडे जाणारा मार्ग ब्लाइंड टर्न झाला असून, त्यातच हॉस्पिटलसमोेरील चौफुलीवर अपघात होत आहेत. हा मार्ग बंद करावा, अशी मागणी होत आहे.
-------
भाजी मार्केटचा वाद मिटेना
नाशिक : महापालिकेच्या वतीने आकाशवाणी टॉवरजवळ बांधण्यात आलेल्या भाजी मंडईचा वाद अद्याप मिटत नसून सेाडत पुन्हा पुन्हा काढण्याची मागणी आणि त्याला होणारा विरोध यामुळे प्रशासनदेखील त्रस्त झाले आहेत. यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने प्रशासनाचीदेखील कुंचबना होत आहे.
-------
भोसला परिसरात वीजपुरवठा खंडित
नाशिक : महावितरणच्या सातपूर उपकेंद्रात येणाऱ्या भोसला स्कूलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या परिसरात वारंवर वीजपुरवठा खंडित हेात आहे, दर शनिवारी तर महावितरणाची जणू साप्ताहिक सुटी असल्याच्या धाटात वीजपुरवठा खंडित होत आहे, तर अन्य दिवशी कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित होत असतो.
-----
आरकेवरील बहुमजली वाहनतळ कागदावरच
नाशिक : रविवार कारंजावर सुंदरनारायण मंदिराजवळ महापालिकेने बहुमजली वाहनतळासाठी जागा ताब्यात घेण्यात आली. मात्र, त्यानंतर बहुमजली वाहनतळाचा कोणताही प्रस्ताव पुढे न आल्याने उलट-सुलट चर्चा होत आहे. रविवार कारंजा परिसरात वाहनतळ नसल्याने गंगावाडी भाजीबाजार येथे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र नंतर तो रखडला आहे.