नाशिक : बोहरपट्टीतील सरकारवाड्याला खेटून पसारा मांडून बसणाºया मसाला विक्रेत्यांना हटविण्यात येणार असून, सदर विक्रेत्यांचे स्थलांतर गोदाघाटावरील नारोशंकर मंदिराच्या समोर असलेल्या मनपाच्या इमारतीखालील जागेत करण्यात येणार आहे. मसाला विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यात आल्यानंतर पुन्हा बोहरपट्टीत अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेने आपले पथक तैनात ठेवणार आहे. बोहरपट्टीतील रस्ता आधीच अरुंद, त्यात दोन्ही बाजूंना भाजीविक्रेत्यांसह मसाला विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो. विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे दोन्ही बाजूने वाहने जाणे अवघड होऊन बसले आहे. त्यात वाहतूक कोंडी होऊन वादविवादाचेही प्रसंग घडत असतात. बोहरपट्टीतील मसाला विक्रेत्यांना अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी अनेक महिन्यांपासून महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, विक्रेते दाद देत नव्हते. विक्रेत्यांनी उपोषणाचीही तयारी चालविली होती. परंतु, पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी सदर विक्रेत्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली आणि हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर न केल्यास अतिक्रमणविरोधी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. चर्चेच्या फेºयांनंतर विक्रेत्यांनी नारोशंकराच्या मंदिरासमोर असलेल्या मनपाच्या इमारतीखालील पार्किंगच्या जागेत स्थलांतर करण्यास संमती दिली. त्यानुसार, विभागीय अधिकाºयांनी तातडीने मंगळवारी (दि.१९) रात्रीच सोडत काढली आणि १७ विक्रेत्यांचे हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. हॉकर्स झोनमध्ये प्रत्येकाला ५ बाय ५ ची जागा देऊन त्यानुसार आखणी करून देण्यात आली असून मसाला विक्रेत्यांनी स्थलांतर केल्यास बोहरपट्टीतील रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, बुधवारी (दि.२०) सकाळी काही वेळ विक्रेत्यांनी नव्या जागेत व्यवसाय थाटला परंतु, नंतर तेथे सोयीसुविधा नसल्याचे कारण देत पुन्हा बोहरपट्टीत ठाण मांडले. त्यामुळे, विभागीय अधिकाºयांनी कोणत्याही स्थितीत बोहरपट्टीत विक्रेत्यांना बसू न देण्याचा निर्णय घेतला असून कारवाईचा इशारा दिला आहे.बोहरपट्टीतील १७ मसाला विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. सदर जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. एक वाहनासह कर्मचाºयांचे पथक त्याठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. बोहरपट्टीत अतिक्रमण करणाºया अन्य विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पश्चिम विभागात एकूण २७ हॉकर्स झोन असून, टप्प्याटप्प्याने विक्रेत्यांना त्याठिकाणी स्थलांतरित करण्याची योजना आहे.- नितीन नेर, विभागीय अधिकारी, पश्चिम विभाग
मसाला विक्रेत्यांचे हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:12 AM