नाशिक : एकात्मिक बालविकास विभागाप्रमाणे नाशिक महापालिकेनेही अंगणवाडीतील बालकांना घरपोच पोषण आहार म्हणजेच खाऊ वाटप सुरू केले आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेचे आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या आदेशानुसार वाटप करणाऱ्या सेविकांना मास्क किंवा तत्सम सुरक्षा साधनेच उपलब्ध करून दिली नसल्याचे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर त्यांना कोरोनाबाधित क्षेत्रातही घर सर्वेक्षणासाठी नेले जात असल्याने अत्यंत जोखमीने त्यांना काम करावे लागत आहे.गेल्या महिन्यात राज्यात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाउन आणि संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्व शिक्षण संस्था बंद करण्यात आल्या. अंगणवाड्यादेखील बंद करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात महापालिकेच्या सुमारे पावणेचारशे अंगणवाड्या आहेत. त्यात सुमारे दहा ते बारा हजार मुले आहेत. या अंगणवाड्याही गेल्या महिन्यात बंद करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने एकात्मिक बाल विकास विभागाला अंगणवाडीत येणाºया बालकांच्या घरपोच पोषण आहार पोहोचविण्याचे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही २९ एप्रिल रोजी आदेश जारी केले आहे. त्यानुसार एकदाच अंगणवाडीतील मुलांना गूळ, शेंगदाण्याचा लाडू, गूळ आणि शेंंगदाणे प्रत्येकी अडीचशे ग्रॅम, मटकी आणि मोडाची उसळ (शिजवलेली) तसेच अर्धा डझन केळी असा पोषण घरोघर पोहोचविण्याचे निर्देश आहे. संबंधित बचत गटाला ९० रुपयांचा हा खाऊ पोहोचवायचे आदेश असले तरी घरपोच सेवा देताना अंगणवाडी सेविकांनी मास्क, सॅनिटायझर, ग्लोज वापरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अशाप्रकारे कोणतेही सुरक्षित साधने देण्यात आालेली नाहीत महापालिकेच्या आंगणवाड्या सेविकांना अशाप्रकारची साधने देण्यात आली नाही आणि उलट सर्व महिलांनी ती स्वत:हून खरेदी करावीत असे मुख्य सेविका सांगत असल्याचे काही सेविकांनी सांगितले. महापालिकेच्या अंगणवाड्या बहुतांशी दाट वस्तीत आहे, अशावेळी पुरेशी सुरक्षित साधने नसताना घरपोच पोषण आहार वाटप करणे जिकिरीचे असल्याचे सेविकांनी सांगितले.-------महापालिकेच्या सर्व अंगणवाड्यांच्या सेविका पोषण आहार घरोघरी पोहोचवित आहेत. पोषण आहाराबरोबरच बाधित रुग्णाच्या घर सर्वेक्षणात त्यांच्याबरोबरच अन्य कर्मचारीसुद्धा जोखीम पत्करून असतात. सध्या आपत्तीच अशी आली आहे. पोषण आहार पुरविताना सुरक्षा साधने नसल्याबाबत प्रशासनाकडे कोणत्या प्रकारचे तक्रार आलेली नाही.- अर्चना तांबे, उपआयुक्त, समाजकल्याण विभाग
मास्क ना सॅनिटायझर सेविका फिरताहेत रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 10:38 PM