नाशिक : शहरातील नऊ मुस्लिम जोडप्यांचा ह्यनिकाहह्ण सामूहिक पध्दतीने जुने नाशिक भागातील द्वारका येथे पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात रविवारी (दि.३१) पार पडला. युवा आदर्श मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने आयोजित या सामूहिक सोहळ्यात नववधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरु सय्यद मोईनुद्दीन अशरफ जिलानी (मोइन मियां) उपस्थित होते.
दरवर्षी जानेवारी महिन्यात जुने नाशिक भागात युवा आदर्श या संस्थेकडून मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाहसोहळा आयोजित केला जातो. यंदाचे हे नववे वर्षे होते. रविवारी सकाळी ११ वाजता मोईन मियां यांच्या खास उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, शहर-ए- खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी, नगरसेवक समीना मेमन, सलीम शेख, मुशीर सय्यद, जेएमसीटीचे हाजी रऊफ पटेल, गुलजार कोकणी, अकरम खतीब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काजी हासिमोद्दीन यांनी धार्मिक पारंपरिक पध्दतीने निकाहचा विधी पार पाडला तर खतीब यांनी खास 'खुतबा' पठण केला. यावेळी ज्येष्ठ धर्मगुरु मोईन मियां यांनी दुवापठण करताना नववधू-वरांच्या भावी सौख्यभऱ्या वैवाहिक आयुष्यासाठी दुवा मागितली. तसेच समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी करण्यासाठी अशाप्रकारचे विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनीसुध्दा विवाह अगदी साधेपणाने करण्याची शिकवण समाजाला दिली आहे, हे विसरुन चालणार नसल्याचे मोईन मियां यांनी सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बबलू शेख यांनी केले. दरम्यान, नववधू-वरांना एकसमान संसारोपयोगी भेटवस्तूही देण्यात आल्या. तसेच आलेल्या सर्व वऱ्हाडींकरिता भोजनाचीही व्यवस्था केली होती.वऱ्हाडींना सॅनिटायझर अन् मास्कचे वाटपसंस्थेच्या वतीने आलेल्या वऱ्हाडी मंडळींना मांडवामध्ये प्रवेश करताना सॅनिटायझर व मास्क दिले जात होते. बैठकव्यवस्थेतही अंतर राखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचप्रमाणे थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी यावेळी रक्तदान शिबीरही घेण्यात आले. यावेळी आलेल्या वऱ्हाडी मंडळींमधून तसेच संस्थेच्या काही कार्यकर्त्यांमधून रक्तदात्यांनी रक्तदान केले. दिवसभरात सुमारे ६० ते ६५ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले.-