मनमाड /नाशिक : नांदगाव रोडवरील बुरकुल वाडी भागातील एन. आर. फ्लोअर मिल या रवा व मैदा तयार करणाऱ्या मिलला भीषण आग लागली आहे. या आगीत रवा तयार करण्यासाठी साठवण्यात आलेले धान्य व गोण्या जळून खाक झाले आहे.
मिलच्या खिडकीतून धुर निघत असल्याची बाब बुरकुल वाडी भागातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत मिलचे मालक बेडमुथा यांना कळवले. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले. पालिकेच्या तीन अग्निशमन बंबापैकी दोन बंब हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या नेत्यांच्या सभेसाठी गेलेले असल्याने एकच बंब घटनास्थळी पोहचला. खासगी टँकर व अग्निशमन दलाच्या बंबानी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
मिलमध्ये ठेवण्यात आलेल्या रिकाम्या गोण्या व बरदाने यामुळे आगीने कमी वेळात रौद्र रूप धारण केले होते.आद्योगिक वसाहतीत लागलेल्या या आगीमुळे एकच खळबळ उडाली. आज रविवार असल्याने कामगारांना सुट्टी होती म्हणून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.