नाशिक : गुजरातसह दीव, दमण व सिल्व्हासा या केंद्र शासित राज्यांची सीमा लागून असल्याने मद्य तस्करांनी नाशिक जिल्ह्यात आपले हातपाय चांगलेच रोवल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. महिना भरात सुमारे २३ हजार लिटर देशी, विदेशी व बिअरचा बेकायदेशीर साठा पकडण्यात आला असून, एकूण कारवाईत ३७ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या या कारवाईचे यश पाहता, मद्यतस्करांची मोठी टोळी जिल्ह्यात कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे.साधारणत: डिसेंबर महिन्यात नव वर्षाचा जल्लोष साजरा करतांना मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो,त्यासाठी देशी, विदेशी मद्य, बिअरचा सर्रास वापर केला जात असल्याने मद्यप्रेमींची मागणी लक्षात घेता, बनावट मद्य तयार करून ते विक्री करण्यात मद्य तस्करांचा कल असतो. नाशिकपासून जवळच दीव, दमण, सिल्व्हासा ही केंद्रे शासीत राज्ये असून, याठिकाणी निर्मित होणा-या मद्याची किंमत कमी तसेच त्यावर कोणतेही शुल्क नसल्याने निम्म्याहून अधिक कमी किंमतीत मद्याची विक्री केली जाते. विशेष म्हणजे या ठिकाणी मद्याची खुली विक्री होत असल्यामुळे कितीही मद्य खरेदी करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. नेमका त्याचाच फायदा मद्यतस्करांकडून घेतला जात आहे. लहान, मोठ्या वाहनातुन चोरी, छुप्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दीव, दमण निर्मित दारू आणली जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क खात्याने केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात १८९ ठिकाणी केलेल्या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०४ लिटर बिअर, एक हजार लिटर विदेशी मद्य, १३०० लिटर हातभट्टीची दारू, १६०० लिटर देशी दारू, ४६० लिटर ताडी व देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे सुमारे १८४५९ लिटर रसायन जप्त केले आहे. दारूची वाहतुक करणारे १२ वाहनेही ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ३७ लाख, ५९ हजार रूपयांचा मुद्देमाल या कारवाईत सापडला आहे. ११३ मद्यतस्करांना अटक करण्यात आली आहे. सन २०१६ मध्ये करण्यात आलेल्या कारवाईपेक्षा यंदा दुप्पट कारवाई करण्यात आली असून, याचाच अर्थ मद्यतस्करांची मोठी टोळी जिल्ह्यात कार्यरत झाल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्याच्या सिमेवरच त्यांचे अड्डे असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक जिल्ह्यात बेकायदेशीर दारूचा महापूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 2:40 PM
साधारणत: डिसेंबर महिन्यात नव वर्षाचा जल्लोष साजरा करतांना मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो,त्यासाठी देशी, विदेशी मद्य, बिअरचा सर्रास वापर केला जात असल्याने मद्यप्रेमींची मागणी लक्षात घेता, बनावट मद्य तयार करून ते विक्री करण्यात मद्य तस्करांचा कल असतो.
ठळक मुद्दे२३ हजार लिटर जप्त : उत्पादन शुल्कची कारवाई कारवाईत ३७ लाखाचा माल जप्त करण्यात आला