एस़ आऱ शिंदे पेठअनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या तालुक्यातील कोहोर गटातील या वेळची जिल्हा परिषदेची निवडणूक रणरागिणींमध्ये रंगणार असून, सेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेससह माकपाने आखाड्यात प्रवेश केल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आल्याचे दिसून येत आहे.सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या गटातून विद्यमान सदस्य भास्कर गावित यांच्या स्नुषा व पेठ गटाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हेमलता भास्कर गावित यांना उमेदवारी देऊन ही जागा शाबूत ठेवण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला आहे. मागील निवडणुकीत दुसऱ्या क्र मांकावर असलेल्या मनसेने पुन्हा एकदा सुधाकर राऊत यांची कन्या देवता यांना रिंगणात उतरविले आहे. शिवसेना ही जागा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मनसेची रणनीतीही महत्त्वाची ठरणार आहे. भाजपाने कुळवंडीचे सरपंच पंढरीनाथ जाधव यांच्या पत्नी निर्मला जाधव यांना उमेदवारी देऊन लढतीत रंग भरला आहे.कॉँग्रेसने माजी सभापती व कॉँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष आनंदा वाघेरे यांची नातसून रंजना वाघेरे यांना उमेदवारी देऊन आनंदा वाघेरे यांचे कार्य मतदानात कॅश करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीत बिघाडी झाल्यानंतर राष्ट्रवादीने कविता चौधरी यांना रिंगणात उतरविले आहे.आघाडीत ही जागा कॉँग्रेसला दिली जात असल्याने यावेळी कॉँग्रेस राष्ट्रवादीने स्वतंत्र चूल मांडली आहे. पेठ व सुरगाणा तालुक्यात राजकीय छाप असलेल्या माकपाने कोहोर गटातून मनीषा चौधरी यांना उमेदवारी देऊन आपली वोट बँक भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रमुख सहा राजकीय पक्षांमध्ये हा सामना रंगणार असल्याने, शिवाय मतविभागणीला कारणीभूत ठरणारे अपक्ष नसल्याने या गटातून सरळ लक्षवेधी लढत रंगणार आहे.
रणरागिणींमध्ये सामना
By admin | Published: February 14, 2017 12:13 AM