वसंत तिवडे त्र्यंबकेश्वरतालुक्यातील तीन गटांपैकी ठाणापाडा गट हा तालुक्याच्या सीमेवरील गट. पूर्वी हा परिसर पेठ तालुक्यात होता. या भागावर माकपचे वर्चस्व होते. यंदा मात्र गटात आमदार निर्मला गावित यांचा मुलगा हर्षल गावित, माकपचे रमेश बरफ, ठाणापाड्याचे भूमिपुत्र व सध्या नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांच्या पत्नी भारती भोये या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी करीत आहेत.या गटात खरी लढत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. ठाणापाडा गट अनु. जमात राखीव असून, गटात बाहेरच्या उमेदवारांनी गर्दी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्याच्या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा घेतली आहे, तर आमदार निर्मला गावित स्व:त त्र्यंबकेश्वर तालुक्यात संपतराव सकाळे यांच्यासह एकाकी झुंज देत आहेत. त्यांनाही ठाणापाडा येथे मेळावा व हरसूलला निवडणुकीपूर्वी सभा घेतली. भाजपाने पंकजा मुंडे व विष्णू सावरा यांच्या सभा आयोजित केल्या आहेत. विष्णू सावरा यांची हरसूलला नुकतीच सभा झाली. शिवसेनेने मात्र अद्याप त्र्यंबक तालुक्यात सभा, मेळावे घेतल्याचे ऐकिवात नाही. एकूणच यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाच्याच हालचाली दिसून येत आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादीचे विनायक माळेकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने ठाणापाडा हरसूलमध्ये नाही म्हटले तरी राष्ट्रवादीच्या बाजूने सहानुभूतीची लाट आल्याचे दिसते. त्यामुळेच वरच्या पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असलेल्या मित्रपक्षांत त्र्यंबकेश्वर तालुक्यात मैत्रीला तडा गेल्याचे चित्र आहे. त्यामुळेच ठाणापाडा, हरसूल, अंजनेरी गटात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्येच दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अर्थात, सेना-भाजपा आणि माकप यांचेही आव्हान या पक्षांसमोर राहणार आहे.डॉ. भोये यांनी नाशिक जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय व त्याअगोदर त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कामे केली आहेत. त्यामुळे तालुक्यातच त्यांचा संपर्क अधिक आहे. काँग्रेसचे हर्षल गावित यांच्या मातोश्री आमदार निर्मला गावित यांचा ठाणापाडाच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात आमदार या नात्याने दांडगा जनसंपर्क आहे. त्यांनी गेल्या आठ-नऊ वर्षांच्या कार्यकाळात अनेक कामे केली आहेत.भागओहळ येथील रहिवासी कौशल्या लहारे या सुशिक्षित उमेदवार तसेच भाजपाच्या तालुकाध्यक्ष आहेत. त्यांच्या मातोश्री बनीबाई लहारे यांनी २००२ मध्ये भाजपाकडून निवडणूक लढविली होती, मात्र त्याचा पराभव पत्करावा लागला होता.हरसूलचे रहिवासी असलेले शिवसेनेचे उमेदवार नितीन लाखन हे आक्रमक वृत्तीचे व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले युवक आहेत.
कॉँग्रेस-राष्ट्रवादीत रंगणार सामना
By admin | Published: February 16, 2017 12:28 AM