नायगाव : ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून गावे गजबजू लागली आहेत. सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव करून अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. या निवडणुकीत गावपुढा-यांच्या पाठोपाठ तळीरामांनाही सुगीचे दिवस आले आहे.
ग्रामीण भागातील सर्वात जास्त चुरशीची व प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे बघितले जाते. याच निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. गाव विकासाचे केंद्र असलेल्या व ग्रामीण भागात सरपंच पदाला महत्त्व असल्यामुळे ही निवडणूक दिवसेंदिवस प्रतिष्ठेची बनत आहे. कोराेनामुळे लांबलेल्या या निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या १५ तारखेला होणार आहे. फाॅर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्यामुळे इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहे. कोणत्या वाॅर्डात कोणता उमेदवार सरस पडेल. तसेच कोणत्या इच्छुक उमेदवाराचा कसा उपयोग होईल, याचे पुरेपूर ज्ञान असलेल्या पुढाऱ्यांनी सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. ऐन थंडीत निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याने गावामध्ये माणसांची गर्दी वाढू लागली आहे.
याचवेळी आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावपुढा-यांबरोबर जवळच्या मित्रांना (तळीराम) ही मागणी वाढत आहे. संध्याकाळच्या कोपरा बैठकांना सध्या गर्दी जमू लागली आहे.
----------------------
बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न
निवडणूक म्हटल्यावर कार्यकर्ते व खर्च हा आलाच. तसेच उमेवारांच्या मायेचा पाझर फुटण्याचे प्रमाणही आपसूकच वाढते. यात सकाळचा (बळजबरीचा) रामराम, चहापाणी, नाश्त्यासह संध्याकाळच्या बैठकीवरही उमेदवारांना लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे येत्या काही दिवस तरी होऊ दे. खर्चाचीच चर्चा रंगणार आहे. सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडत असताना नायगाव खो-यातील काही गावांमध्ये ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याच्याही हालचाली सुरू आहे. वाद-विवादही टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही गट आग्रही दिसत आहे. तर काही उमेदवारांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केल्यामुळे या निर्णयाला विरोध करताना दिसत आहे. त्यामुळे खो-यात कही खुशी, कही गम असे वातावरण आहे.