सायखेडा : राष्ट्रीय आरोग्य अभियान उपक्रमासह सुरक्षित मातृत्वासाठी सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना गरोदर मातांपर्यंत योग्यवेळी पोहोचल्याने जन्मदात्रीसह नवजात बालकांचे योग्य उपचाराने संगोपन झाले. त्यामुळे विखरण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकही गरोदर माता किंवा नवजात बालकाला उपचाराअभावी जीव गमावण्याची वेळ आली नाही, तर कुठल्याच उपकेंद्रांतर्गत गरोदर मातेचे घरामध्ये बाळंतपण करण्याची वेळ नाही आली. मातृत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक मातांच्या प्रसूतीकाळात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण गेल्या एक वर्षांत निरंक ठेवण्यात विखरण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारीवर्गाची ही किमया मातृ सुरक्षादिनी उल्लेखनीय अशीच म्हणावे लागेल.
जोखमीच्या प्रसूतीतच मातांच्या जिवाला धोका असल्याने गर्भवतींना सातव्या महिन्यापासूनच आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने आशावर्करच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे माता मृत्यूचे प्रमाण रोखण्याला यश येत आहे. प्रसूतीपूर्वकाळात घ्यावयाची काळजी, आहार व व्यायाम याबाबत महिलांमध्ये जागृती करणे व त्यासाठी कार्यान्वित असलेल्या सरकारी योजनांचा प्रसार आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे. सदर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची प्रसूतीनंतर मिळणाऱ्या, आर्थिक निधीऐवजी प्रसूतीपूर्वकाळातील आहार व आरोग्याबाबत जाणीवजागृती होत आहे. वर्षभरात एकही महिलाची प्रसूती घरात झाल्याची नोंद विखरण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दफ्तरी नाही. प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर दुर्गम भागात वाहनव्यवस्था उपलब्ध होत नाही. त्यामुळे घरातच प्रसूती होते. यावेळी जंतुसंसर्ग होऊन अतिरक्तस्त्राव झाल्यास मातामृत्यूचा धोका वाढतो तसेच मातेचा मृत्यू झाल्यास अंतर्गत नवजात बाळाच्या जीविताचा प्रश्नही निर्माण होतो. परंतु म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व आरोग्य सुविधा योग्यवेळी पोहोचविल्या जातात, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रियंका पवार यांनी सांगितले.