निफाड : तालुक्यातील करंजी येथे ऊसतोड सुरू असताना उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची आईशी भेट घडवून आणण्यात वनविभागाला यश आले आहे.
सोमवार, दि २१ रोजी तालुक्यातील करंजी येथील काळू फकिरा अडसरे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे सापडले. हे बछडे अंदाजे १५ ते २० दिवसांचे आहेत. कामगारांनी ही घटना अडसरे यांनी वनविभागाला कळवली. त्यानंतर तातडीने येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, मनमाडचे वनपाल भगवान जाधव, वनरक्षक सुनील महाले, वनरक्षक गोपाळ हारगावकर, वनसेवक भय्या शेख, नारायण वैद्य आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या बछड्यांना निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणण्यात आले. यातील एक बछडा नर दुसरा बछडा मादी आहे. बछड्यांच्या विरहात मादी बिबट्या हिंसक होऊन नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेऊन आई आणि बछड्यांची भेट घडवून आणण्याचा निर्णय झाला. त्यामुळे बछडे पुन्हा अडसरे यांच्या उसाच्या शेतात ठेवण्यात आली.
दि. २१ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता वनविभागाचे अधिकारी पुन्हा शेतात पोहोचले. या ठिकाणी बछडे एका क्रेटमध्ये ठेवून त्यावर लोखंडी जाळी ठेवण्यात आली. या जाळीला एक दोरी बांधण्यात आली व ही दोरी एका कर्मचाऱ्याच्या हातात दूर अंतरावर देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर वाहनांमध्ये बसून उच्च क्षमतेच्या नाइट मोड कॅमेऱ्यातून बछडे ठेवलेल्या घटनास्थळाचे निरीक्षण करीत होते. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
-------------------
मायेची ममता..
बछड्यांच्या ओढीने व्याकूळ झालेली बिबट्याची मादी शेतात आली. जाळी लावलेल्या क्रेटमधून बछड्यांचा आवाज ऐकून ही मादी क्रेटजवळ आल्यानंतर कर्मचाऱ्याने तातडीने जाळीची दोरी खेचून बछड्यास मोकळे केले. बछडे पाहून मादी बिबट्याने धाव घेत बछड्यांना आपल्या जबड्यात धरून सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला मात्र एकाच वेळी दोन बछडे येणे शक्य नसल्याने तिने एक बछड्याला नेले नंतर धोड्या वेळानंतर परत येऊन दुसऱ्या बछड्यालाही जबड्यात उचलून घेऊन गेली. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बछड्यांची मातृभेट घडवून आणल्याचा वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.---------
कोट
बिबट्याचे बछडे ताटातूट झालेल्या ठिकाणी जाळीत ठेवून सीसीटीव्ही कॅमेरे लावून मायलेकरांची भेट घडवून आणण्याचा हा राज्यातील दुर्मीळ प्रयोग यशस्वी ठरल्याचा आम्हाला आनंद मिळाला आणि समाधान मिळाले आहे. ताटातूट झालेल्या आई आणि बछडे यांची भेट प्रत्यक्ष पाहणे ही बाब खूप भावनिक आणि समाधानाची होती.
- संजय भंडारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला वनविभाग (२२ निफाड ३/४)
===Photopath===
221220\22nsk_2_22122020_13.jpg
===Caption===
२२ निफाड ३/४