नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची शिवसेनेची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना जाहीर झाल्यानंतर उफाळून आलेल्या पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसू नये यासाठी थेट ‘मातोश्री’ने हस्तक्षेप केला असून, सोमवारी यासंदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत नाशिकमधून सेनेचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे, असे आदेश दिल्याने दराडे यांना हायसे वाटले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या एका गटाने नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करून पक्षाकडून तिकीट मिळविल्यावरून सेनेंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. दराडे यांना एकीकडे उमेदवारी जाहीर करताना दुसरीकडे उमेदवारीचे दावेदार शिवाजी सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने या गटबाजीत भर पडली, शिवाय महानगरप्रमुखही तत्काळ बदलण्यात आल्याने सेनेतील वातावरण सैरभैर झाले होते. अशा परिस्थितीत पक्षाच्या बैठकांकडे एका गटाने पाठ फिरविण्याची भूमिका घेत नाराजीचे जाहीर प्रदर्शन घडविल्याचा फटका थेट संपर्क प्रमुख व नेत्यांनाही बसल्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत सेना उमेदवाराचे भवितव्य धोक्यात असल्याचा अंदाज पक्ष प्रमुखांना आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर खुद्द दराडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही पक्षाचे सदस्य प्रतिसाद देत नसल्यामुळे अखेर या वादात उद्धव ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला व त्यासाठी सोमवारी सकाळी ‘मातोश्री’वर बैठक घेण्यात आली. ठाकरे यांनी आकडेवारी वगैरे मला सांगत बसू नका, उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आला पाहिजे, अशी तंबीच उपस्थिताना दिली. या बैठकीस ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, राजाभाऊ वाजे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते.युतीबाबत संभ्रम तोडाया बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी यापुढच्या कोणत्याही निवडणुकीत भाजपाबरोबर युती होणार नसल्याचे सांगत या संदर्भातील संभ्रम मोडीत काढा, असे पदाधिकाºयांना सांगितले. शिवसेना राज्यातील तीन विधान परिषदेच्या जागांवर उमेदवार उभे करणार असून, अन्य तीन जागा लढवणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपासोबत युती होणार नसली तरी, भाजपा सेनेला पाठिंबा देण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.
दराडेंच्या विजयासाठी थेट ‘मातोश्री’चा हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 1:48 AM