नाशिक : माऊ, अगं तू खेळना माझ्याशी... अगं ही काय जागा होती का यायची...असे भावनिक उद्गार काढत दु:खाचा डोंगर कोसळलेल्या पित्याने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला अखेरचा निरोप दिला. नाशिक अमरधामच्या प्रवेशद्वारावर पित्याचा भावनाविवश होऊन हृदय कवटाळून टाकणारा आक्रोश सर्वांच्या अंगाचा थरकाप उडविणारा होता.चांदवड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शिवारात महामार्गावर झालेल्या दोन आयशर टेम्पोच्या धडकेत टाकळी गावातील राहुलनगर परिसरातील सात रहिवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये अवघ्या सहा महिन्यांची समृद्धी मनीष डांगे या बालिकेचाही समावेश आहे. एका खासगी बॅँकमधील स्वाइप विभागात अभियंता म्हणून काम करणारे मनीष यांचा विवाह १८ डिसेंबर २०१६ साली भाग्यश्री यांच्यासोबत झाला. सहा महिन्यांपूर्वी डांगे दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाले. संपूर्ण कुटुंबासह नातेवाइकांनी त्यावेळी आनंदोत्सव साजरा केला होता. मनीष आणि भाग्यश्री यांनी मिळून आपले पहिले अपत्य समृद्धीच्या सर्वांगीण विकासाची विविध स्वप्ने रंगविली. मातेने आपल्या मातृत्वाच्या छायेखाली आपल्या कन्येला वाढविण्यास सुरुवात केली. परिसरातील कांडेकर कुटुंबीयांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आई, आजीसोबत समृद्धीही आयशरमध्ये प्रवास करत होती. दुर्दैवाने या आयशरचा भीषण अपघात झाला. या अपघातात समृद्धीलाही काळाने आई-वडिलांपासून कायमचे हिरावून नेले तर आजी गंभीर स्वरूपात जखमी झाली असून, मृत्यूशी झुंज देत आहेत. मनीष यांच्या पत्नी भाग्यश्री यादेखील किरकोळ स्वरूपात जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पंचवटी परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डांगे, लोंढे, पाटणकर, गवळी, कांडेकर कुटुंबीयांच्या नातेवाइकांच्या एकच आक्रोशाने रविवारी (दि. २४) रात्री नाशिक अमरधाम अक्षरश: सुन्न झाले होते.डांगे कुटुंबीय अत्यंत मध्यमवर्गीय व हलाकीच्या परिस्थितीवर मात करत उदरनिर्वाह करत आहेत. मनीष यांचे वडील एका कपड्याच्या दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावत मुलाच्या संसाराला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या लहानग्या नातीला कायमच्या निद्रिस्तावस्थेत बघून त्यांच्या डोळ्यांचा फुटलेला बांध थांबता थांबत नव्हता. मनीष यांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते. यावेळी स्वत:ला सावरावे कसे आणि पित्याला धीर द्यावा कसा, अशा द्विधा मन:स्थितीत ते सापडले होते. तरीदेखील त्यांनी वडिलांना आधार देण्याचा प्रयत्न करत स्वत:ला काहीसे सावरले. लहानग्या समृद्धीच्या पार्थिवाचे दफन करत एकच टाहो फोडला. त्यांचा आक्रोशाने जणू गोदामाईदेखील क्षणभर स्तब्ध झाली होती.
‘माऊ, ही काय जागा होती का यायची...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 1:24 AM