नाशिक : सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर . . . हे भारूड, लंगडा रे लंगडा रे... ही गौळण यांसह विविध कलागुणांचा संगम ‘मविप्र सांस्कृतिक आविष्कार’ या कार्यक्रमात बघायला मिळाला. मंगळवारी (दि. ३१) गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मविप्र संस्थेतर्फे जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला, साहित्य आणि संगीतातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘युवा स्पंदन’ आणि ‘सांस्कृतिक आविष्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सर्व शाखांमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे कला सादरीकरण मंगळवारी झाले. विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचे कला गुण संस्थेतील पदाधिकाऱ्यांना एकाच वेळी बघायला मिळावे, यासाठी प्रामुख्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मविप्रच्या १७ ते १८ शाखेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात आपल्या कलांचे सादरीकरण केले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी शंभर वर्षांपूर्वी शिक्षण हा उद्देशसमोर ठेवून कर्मवीरांनी शिक्षण संस्थांची उभारणी केली असली तरी आताच्या परिस्थितीत परिपूर्ण माणूस तयार करण्यासाठी संस्थेतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमधील दरी कमी करण्याच्या उद्देशाने संस्था दर्जेदार उपक्रम राबवत असल्याची माहिती दिली.रावसाहेब थोरात सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमास नीलिमा पवार, सुनील ढिकले, मुरलीधर पाटील, भाऊसाहेब खातळे, डॉ. तुषार शेवाळे, कृष्णा भगत, माणिकराव बोरस्ते, बाळासाहेब वाघ, अशोक पिंगळे, बी. आर. पाटील, एस. के. शिंदे, डी. डी. काजळे, नानासाहेब पाटील, सी. डी. शिंदे, आर. डी. दरेकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विविध कलागुणांनी रंगला ‘मविप्र सांस्कृतिक आविष्कार’
By admin | Published: February 06, 2017 11:33 PM