नाशिक - येत्या ४ जानेवारीपासून शहरात स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ होणार असून नाशिकच्या कामकाजाबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाही या सर्वेक्षणाबाबत गंभीर झाली आहे. महापौर रंजना भानसी यांनी शहरातील कच-याच्या ब्लॅक स्पॉटची कुठेही कधीही अचानक पाहणी करणार असून कचरा वेळेत उचलला न गेल्यास संबंधित ठेकेदारासह आरोग्याधिका-यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक शहर १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या दत्तक नाशिकने यंदा पहिल्या दहा क्रमांकात येण्यासाठी आग्रह धरला आहे. महापालिका प्रशासनाने आपल्या स्तरावर स्वच्छ सर्वेक्षणातील गुणांकनासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या असल्या तरी मागील सप्ताहात झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या एकूणच कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती व पहिल्या पाचमध्ये आलेच पाहिजे, असा दम नंतर जिल्हाधिका-यांनी महापालिकेला भरला होता. त्या पार्श्वभूमीवर गेल्या शनिवारी महापौरांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक बोलावून स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेशित केले होते. सोमवारी (दि.१) पत्रकारांशी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी सांगितले, शहरात ४५० हून अधिक कच-याचे ब्लॅक स्पॉट आहेत. या ब्लॅक स्पॉटवर कचरा टाकण्यास नागरिकांना प्रतिबंध केला पाहिजे आणि महापालिकेच्या घंटागाडीनेही तत्काळ तेथे पडलेला कचरा उचलला पाहिजे. त्यासाठी आपण स्वत: रोज सकाळी जेथे जेथे कच-याचे ब्लॅक स्पॉट आहेत, तेथे अचानक भेटी देणार असून कचरा उचलला नसल्यास संबंधित घंटागाडी ठेकेदार तसेच आरोग्याधिका-यावरही कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही रस्त्यावर कचरा टाकणे थांबविले पाहिजे. आपला परिसर त्यांनी स्वच्छ ठेवला पाहिजे, यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.शौचालय दुरुस्तीचे आदेशशहरात महापालिकेची सार्वजनिक शौचालये आहेत. त्यातील बºयाच शौचालयांची अवस्था बिकट बनलेली आहे. काही ठिकाणी भांडी तुटलेली आहेत तर अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे. दरवाजे तुटलेल्या स्थितीत आहे. सदर शौचालयांची दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून आयुक्तांनी त्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली.
नाशिक शहरातील कच-याच्या ब्लॅक स्पॉटची महापौर करणार अचानक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 6:53 PM
स्वच्छ सर्वेक्षण : कचरा उचलला न गेल्यास कारवाईचा बडगा
ठळक मुद्देयेत्या ४ जानेवारीपासून शहरात स्वच्छ सर्वेक्षणाला प्रारंभ होणारनाशिकच्या कामकाजाबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाही या सर्वेक्षणाबाबत गंभीर