नाशिक : मंगळवारी (दि. २१) कक्ष प्रवेश सोहळा झाल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि. २२) आरोग्य व वैद्यकीय विभागासह सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेत शहरातील स्वच्छता, घंटागाड्या, साथीचे आजार आणि सार्वजनिक शौचालय व्यवस्था या समस्यांप्रकरणी जाब विचारला. याचवेळी महापौरांनी महापालिका मुख्यालयातील स्वच्छतागृहांनाही भेट देत कानउघाडणी केली. आठवडाभरात कामकाजात सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशाराही महापौरांनी दिला. महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी मंगळवारी प्रत्यक्ष सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत आपल्या कठोर कारभाराचे संकेत दिले. महापौरांनी आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. आरोग्य विभागाचे कामकाज असमाधानकारक असल्याचे सांगत महापौरांनी नाराजी व्यक्त केली. स्वाइन फ्लू, डेंग्यू या आजारांबाबत आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. स्वच्छतागृहांची पाहणीशहरातील सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहांची अवस्था खराब असल्याचे सांगतानाच महापौरांनी बैठकीतूनच सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालयातील महिला स्वच्छतागृहाकडे नेले. महापालिकेच्या मुख्यालयातीलच स्वच्छतागृहांची दैना झालेली असताना शहरातील स्थिती काय असेल, असा जाब विचारत महापौरांनी अधिकाऱ्यांना दुर्गावतार दाखविला. याबाबत त्वरित कारवाईचे आदेश महापौर यांनी दिले. यावेळी उत्तरे देताना अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. आरोग्याधिकाऱ्यावर संक्रांतमहापालिकेत आरोग्य विभागाबरोबरच वैद्यकीय विभागाचाही अतिरिक्त कार्यभार डॉ. विजय डेकाटे यांच्याकडे आहे. डेकाटे यांच्याकडून धडपणे आरोग्य विभागाचाच कारभार नीट होत नसताना वैद्यकीय विभागाचा कारभार कसा होत असेल, अशी शंका महापौरांनी उपस्थित केली. भर बैठकीतच त्यांनी तत्काळ आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत डेकाटे यांच्याकडील वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभार तत्काळ काढून घेत स्वतंत्र अधिकाऱ्याकडे कार्यभार सोपविण्याची मागणी केली.
महापौरांचा दुर्गावतार!
By admin | Published: March 23, 2017 12:48 AM