नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या प्रवासी वाहतुकीसाठी शहर बस जुलै महिन्यात सुरू करण्यात येणार असून, त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी व शहर बस आगाराच्या कामांची पाहणी करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी रविवारी शहर अभियंता यांच्या समवेत पाहणी दौरा केला.
पंचवटी विभागातील तपोवन येथील नव्याने होत असलेल्या बस आगाराची पाहणी केली असता त्या ठिकाणी एकूण १६७ बसकरिता आगार राहणार असून, लगतच प्रवाशांकरिता बस टर्मिनल उभारले जाणार आहे. टर्मिनलमधून प्रवाशांकरिता सोयीसुविधा उपलब्धतेबाबत महापौरांनी माहिती जाणून घेतली. त्यामध्ये शॉपिंग सेंटर असून, लगतच विद्युत मंडळाचे सबस्टेशन राहणार असल्याने इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगची ही सुविधा होणार आहे, तसेच कार्यालयही असून, तिथून शहरातील सिडको, सातपूर, पाथर्डी या भागातील बस कशा सुटतील, त्याची माहिती जाणून घेतली.
शहर वाहतूक बस आगार क्रमांक २ सिन्नर फाटा येथील आगाराची ही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी वर्कशॉप शेड, वॉशिंग शेड कार्यालय, तसेच सीएनजी बससाठी आवश्यक असलेले सीएनजी पंप इत्यादी सुविधा राहणार आहे. या आगारामध्ये एकूण २२० बसची पार्किंग व्यवस्था राहणार आहे. या भागातून देवळाली कॅम्प, भगूर, नाशिक, सातपूर इत्यादी भागांच्या बस सुटणार आहेत. सदरच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी शहर अभियंता संजय दुबे, नगररचनाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर आहेर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
२७ महापौर