नाशिक : माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमूल्य वाढवितानाच खुल्या जागांवर कर लागू केला होता. त्यामुळे शेतीवर कर लागू झाल्याने शहरात असंतोष निर्माण झाला होता. सदरचा कर रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महापौर रंजना भानसी यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे. रंजना भानसी यांनी यासंदर्भात गमे यांची भेट घेतली. त्यांच्या समवेत सभागृह नेता दिनकर पाटील आणि गटनेता संभाजी मोरूस्कर होते. महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खुल्या जागेवर कर लागू केल्याने वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महापौर भानसी यांनी गमे यांना निवेदन देऊन शेतीवरील कर रद्द करण्याची मागणी केली. महापालिकेच्या वतीने सध्या नागरिकांना घरपट्टीसाठी नोटिसा बजावल्या जात असून, त्याचे पुनर्मूल्यांकन करून त्यात तातडीने दुरुस्ती करावी, असेही भानसी यांनी सांगितले. त्याचबरोबर यापूर्वी २०१८-१९ च्या महासभेने अंदाजपत्रकात मंजूर केलेली परंतु नंतर रद्द केलेली कामे पूर्ववत करण्यात यावी, अर्थसंकल्पात नगरसेवक निधीची तरतूद करावी अशी मागणीदेखील केली. नगररचना विभागाशी संबंधित समस्यांकडेदेखील महापौरांनी लक्ष वेधले. आॅटोडीसीआर लवकर दुरुस्त करण्यात यावा तसेच कंपाउंडिंग पॉलिसी अंतर्गत दाखल प्रकरणांची छाननी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.सकारात्मक भूमिकामहापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्वच प्रकरणांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे. सर्व प्रकरणांची माहिती घेऊन अडचणींबाबत तोडगा काढू, असे आयुक्तांनी सांगितल्याचे भानसी यांनी सांगितले.
शेती कर रद्द करण्यासाठी महापौरांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:24 AM