नाशिक- शहराच्या महापौरपदासाठी उमेदवारीचा घोळ सुरूच आहे. भाजपाच्या वतीने मध्यरात्री 3 वाजेपर्यंत इगतपुरीतील हॉटेल मानस येथे बैठका सुरू होत्या, परंतु अद्याप उमेदवारीचा निर्णय झालेला नाही. आता काही वेळाने निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून सतीश कुलकर्णी, दिनकर आढाव आणि शशिकांत जाधव यांची नावे चर्चेत आहेत.दुसरीकडे शिवसेनेत अजय बोरस्ते किंवा सुधाकर बडगुजर यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. उपमहापौरपद भाजपाचे बंडखोर आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेल्या कमलेश बोडके यांना दिले जाण्याची शक्यता आहे. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज सकाळी 11 वाजता होणार असून, आता अवघे काही तास उरले आहेत. मध्यरात्री पाथर्डी फाटा येथील हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ, काँग्रेस निरीक्षक श्याम सनेर आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी आदींसह तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
नाशिकच्या महापौरपदासाठी रस्सीखेच, अद्याप उमेदवार घोषित नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 9:05 AM