नाशिक : नाशिक महापालिकेत महापौर आमचाच होणार असे ठरलेय, असे सुचक विधान खा. संजय राऊत यांनी केले. महापौर पदावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मनपा निवडणुकीबाबतच चर्चा झाली का? या प्रश्नावर मात्र त्यांनी अधिक बोलणे टाळले.
नाशिक दौऱ्यावर आलेले शिवसेना खा. संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयाचा नूतनीकरण तसेच पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी शिवसेनेचाच महापौर होईल, असा पुनरुच्चार केला. यापूर्वी नाशिकमध्ये आल्यानंतर राऊत यांनी महापौरपदाविषयी भूमिका मांडली होती. यावेळीदेखील त्यांनी पुन्हा एकदा महापौर पदाविषयीचे स्पष्ट विधान केले. राऊत यांच्या विधानामुळे घटक पक्षांमध्ये नाराजी व्यक्त होऊ शकते, असे विचारले असता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने घटक पक्षांमध्ये याबाबत कोणतीही नाराजी असण्याचे काही कारण नसल्याचे म्हटले. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून ‘आमचं ठरलंय’ हा मंत्र महत्त्वाचा झालाय. त्यानुसार महापौर पदाविषयी आमचे ठरले आहे, असे विधान त्यांनी केले.
नाशिक दौऱ्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवसास्थानी झालेल्या बैठकीत मनपा निवडणुकीसंदर्भात काही चर्चा झाली का? असे विचारले असता त्यांनी अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे सांगून चर्चेतील सर्वच विषय सांगायचे नसातात, असेही म्हटले. बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. दोन राजकीय नेत्यांची भेट असल्याने राजकीय चर्चा होणारच असे सुचक विधान त्यांनी केले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या इतर पक्षांकडून चाचपणी केली जात असताना राऊत यांनी पुढचा महापौर शिवसेनेचा होणार असल्याचे विधान करून आपला इरादा स्पष्ट केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांकडून स्थानिक तसेच वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून स्थानिक नेतृत्वात त्याअनुषंगाने बदलही करण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत राऊत यांच्या विधानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.