नाशिक : गेल्या महासभेत तहकूब करण्यात आलेले धोरणात्मक विषय यंदाच्या महासभेत घेण्यात न आल्याने शिवसेनेसह सर्वच विरोधकांनी महापौर रंजना भानसी यांना सोमवारी (दि. ९) धारेवर धरले आणि गोंधळ घातला. अखेरीस महापौरांनी शुक्रवारी (दि.१३) पुन्हा महासभा बोलवू आणि त्यात संबंधित विषय घेतले जातील, असे सांगितल्यानंतरच वाद मिटला.महापालिकेची महासभा सोमवारी (दि.९) सकाळी सुरू होत असतानाच विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी हा वाद उपस्थित केला. सामान्यत: गेल्या सभेतील तहकूब विषय पुढील सभेच्या विषय पत्रिकेवर प्राधान्याने येत असतात. परंतु गेल्या महासभेत महापौरांनी महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणे आणि सिंहस्थ कालावधीतील पाणीपुरवठ्याच्या कामापोटी १७ कोटी रुपये ज्यादा देण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवला होता.सोमवारच्या महासभेत हा विषय नसल्याने नगरसेवकांनी विचारणा सुरू केली. त्यावरून गोंधळाला सुरुवात केली. महापौर रंजना भानसी यांनी ते विषय पुढील सभेत घेऊ, असे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधक ऐकत नव्हते. त्यामुळे महापौरांनी आजच त्या विषयावर चर्चा करू, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र विषय पत्रिकेवर विषयच नाही तर चर्चा कशी काय करणार असा प्रश्न विरोधकांनी केला. अखेरीस उद्धव निमसे, सभागृह नेता अरविंद सोनवणे यांनी हस्तक्षेप करून महापौर लवकरच आचारसंहितेच्या आधीच महासभा घेतील. त्यात हा विषय घेतला जाईल, असे सांगितले.महापौरांनी आचारसंहितेपूर्वी म्हणजेच येत्या शुक्रवारी (दि.१३) पुन्हा महासभा घेऊन त्यावर नगरसेवकांचे विकासाचे प्रस्ताव मार्गी लावण्याचे जाहीर केल्यानंतर वाद मिटला.सिडकोतील वादाचे पडसाद?गेल्या आठवड्यात सिडकोत सेंट्रल पार्कच्या विकासकामाला शिवसेनेच्या नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे त्याची जाहीर नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच सोमवारी (दि.९) भाजपाला सेनेने अडचणीत आणल्याची चर्चा या निमित्ताने पसरली होती.
शिवसेनेच्या विरोधामुळे महापौर अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:57 AM