नाशिक : डीटीई, सीईटी सेलतर्फे एमबीए प्रवेशप्रक्रियेचे चुकीचे व्यवस्थापन केल्याने आधीच ३४ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला दीड महिना विलंब झाला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महानगरातील विद्यार्थ्यांच्या वतीने हुतात्मा स्मारकात आंदोलन करून प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीच जबाबदार कोण? असा सवाल करण्यात आला.एमबीएसाठी १० मार्चला सीईटी परीक्षा घेऊन ३१ मार्चला निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर ७ जूनला सेतूतील ‘सार’ पोर्टलच्या सहाय्याने कौन्सिलिंगला प्रारंभ झाला. मात्र, सर्व्हर सतत डाउन होत असल्याने नोंदणी करण्यात अनेक अडथळे आले. प्रक्रिया रद्द होऊनही नोंदणीसाठी घेतलेले शुल्क परत केले नाही. तसेच एमबीए प्रवेशासाठी यापूर्वी राज्यातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्के, तर देशभरातील अन्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना १५ टक्के जागा आरक्षित होत्या. मात्र यंदा त्यात बदल करून राज्यातील विद्यापीठांच्या १५ टक्के जागा कमी करून बाहेरील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवत मुंबई न्यायायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने २६ जुलै रोजी निकाल देत पूर्वीच्या आरक्षणानुसारच प्रवेश देण्याचे आदेश दिले. मात्र तोपर्यंत पहिल्या फेरीचे प्रवेश झाले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर एमबीएचे प्रवेश स्थगित करण्यात आले.तातडीने लक्ष देण्याची मागणीएमबीएची प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स प्रदर्शित केली असून, त्यात जेबीआयएमएस कॉलेजला डीटीईने स्वायत्त नसल्याचे मानले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली.
एमबीए प्रवेश घोळाच्या विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:46 AM