परीक्षा ८ मार्चपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे. तर २३ मार्चपासून पदवीपर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा विभाग प्रमुख डॉ. अजित पाठक यांनी दिली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय, दंतरोग होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी आदी विविध विद्याशाखांच्या पदवी अंतिम परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षांना २३ मार्चपासून सुरुवात होणार असून, प्रात्यक्षिक परीक्षा मार्चच्या अखेरीस होणार आहे. तर पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा २३ मार्चपासून घेण्यात येणार असून, एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याचे डॉ. अजित पाठक यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी हिवाळी सत्रातील परीक्षाही ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठातर्फे विशेष कोरोना सुरक्षा कवच विमा देऊन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावेळीही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षेकरिता आवश्यक परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाइन प्रणालीद्वारे संबंधित महाविद्यालयांस वितरित करण्यात येणार असून, लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. याबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.