नाशिक : कुसुमाग्रजांचे साहित्य हे दीपस्तंभासमान असून, आरोग्य शास्त्राच्या विद्यार्थ्यांनीही त्याचा रसास्वाद घ्यावा, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने कुसुमांजली या विशेष कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. या प्रसंगी डॉ.चव्हाण बोलत होते. विद्यापीठातर्फे कोविड परिस्थितीमुळे यंदा हा कार्यक्रम ऑनलाइन झाला. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व गायक संजय गीते यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे गीत सादर केले. त्यांच्याशी मुलाखतीद्वारे साहित्याचा रसास्वाद आणि कवितांचे व स्वगताचे अभिवाचन संवादक डॉ.स्वप्निल तोरणे यांनी केले. याप्रसंगी डॉ.अजित पाठक यांनी सांगितले की, साहित्य हे व्यक्तिमत्त्वाचा विकास करत असते. त्यामुळे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण यूट्यूब चॅनलवरून करण्यात आले आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.