नाशिक : निवडणुका आल्या की मतदारांना रिझवण्यासाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरू होतात. सिडकोत एका इच्छुकाने कसमान्देश म्हणजेच खान्देशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी साऱ्यांनीच आपले नातेगोते शोधण्यास प्रारंभ केला असून, एका उत्साही भाजपा इच्छुकाने तर चक्कफलक लावल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.विधानसभा निवडणुकीच्या शहरातील चार मतदारसंघातील सर्वाधिक इच्छुकांचा मतदारसंघ म्हणून पश्चिम नाशिककडे बघितले जाते. प्रत्येक पक्षाकडे किमान अर्धाडझन इच्छुक उमेदवार आहेत. त्यात प्रबळ किंवा सबळ असे काहीच नसून प्रत्येक स्वत:लाच पात्र ठरवत आहे. केवळ इच्छुक आणि दावेदार आहे, असे नाही तर पक्षाने उमेदवारी दिली तर तयारीत कमी पडायला नको अशाच रीतीने सध्या तयारी सुरू आहे. काही इच्छुकांनी हरिनाम सप्ताह तर काही काहींनी साई भंडारा घेतला. एकाने विशिष्ट समाजाला हाताशी धरून गुणवंत सोहळे आयोजित केले आणि स्वत:ला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर काही इच्छुकांनी आपला समाज कोणताही असो अनेक समाजांसाठी गुणवंत सोहळे घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. इच्छुकांच्या कामगिरीची माहिती पुरवणारे एक, दोन नव्हे तर चार-पाच वेळा पत्रकेही वाटून झाले आहेत. त्यामुळे सिडकोतील निवडणूक अधिक रंगतदार ठरत आहे.नाशिक पश्चिम मतदारसंघात सिडको आणि सातपूर असे दोन भाग पडतात. पैकी सिडको विभागावर खान्देशचे वर्चस्व आहे. भाजपाचे डॉ. दौलतराव आहेर यांनी याच जोरावर विजय मिळवले आणि कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव या कसमा पट्ट्यातील असल्याने याच जोरावर डॉ. आहेर यांचा पराभव केला होता.बहुसंख्याक खान्देशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांचे जिवापाड प्रयत्न सुरू असून, एका इच्छुकाने तर आपण खान्देशी नसतानाही ‘आम्हणं पक्क शे’ असे खान्देशी भाषेतील फलक लावले आहेत. खान्देशी बोलणेही संबंधितांनी सुरू केल्याचीदेखील चर्चा झडत असून, निवडणुकीसाठी वाट्टेल ते याचाच प्रत्यय येत आहे. अर्थात, शिस्तबद्ध भाजपात इच्छुक म्हणून दावेदारी ठीक, परंतु थेट स्वत:च्या उमेदवारीचे फलक लावणे कितपत बसेल याविषयी मात्र भाजपा कार्यकर्तेच शंका व्यक्तकरीत आहेत.
राजकारणाचे मतलबी वारे, अहिराणीचे गाते गाणे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 1:34 AM