कळवण : जिरवाडे गावात दि. ३ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यालगत असलेल्या डोंगरावरील पाणी उतारावरुन वाहून ग्रामस्थांच्या घराघरात घुसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. भविष्यात माळीणसारखी दुर्दैवी घटना कळवण तालुक्यात घडू नये यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी जिरवाडे येथील ग्रामस्थांनी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांच्याकडे केली आहे.
कळवण या आदिवासी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे या भागातील दऱ्याखोऱ्यात, डोंगराच्या पायथ्याशी व कड्याकपारीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून दरवर्षी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाते; मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. दि. ३ जून रोजी पडलेल्या पावसामुळे जिरवाडे गावात डोंगर उतारावरील पाणी घराघरात घुसल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दि. १ जून रोजी तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे कळवण या आदिवासी तालुक्याकडे जिल्हा व तालुका प्रशासनाने विशेष लक्ष देऊन दक्षता घ्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, कळवण पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली.
जिरवाडे येथील डोंगर उतारावरील पाणी वाहून जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली व्यवस्था कायमस्वरूपी नसल्याने पावसाळ्यात आदिवासी बांधवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. पुणे जिल्ह्यातील माळीण घटनेच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यात डोंगर पायथ्याशी असलेल्या व दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी अशी मागणी जयश्री पवार यांनी केली आहे.