नाशिक : शहरातील प्रमुख रस्ते व अपघातप्रवण चौफुल्यांवर महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली आहे़ तर शहर पोलीस वाहतूक शाखा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच वाहतूक कोेंडी व अपघातप्रवण चौफुल्यांवर पोलीस कर्मचारी नियुक्त करते़ याबरोबरच शहरातील अपघाताच्या ठिकाणांची माहिती संकलित करून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणासोबत पत्रव्यवहार वा आवश्यक त्या उपाययोजना करतात़ मात्र, या व्यतिरिक्त शहरात असलेल्या अपघातप्रवण चौफुल्यांचा शोध घेऊन ‘लोकमत’ने अॅक्सिडेंट जंक्शन ही मालिका सुरू केली होती़ या मालिकेची वाहतूक शाखेने दखल घेतली असून, या चौफुल्यावर सिग्नल यंत्रणा तसेच विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगितले आहे़ शहराच्या विस्ताराबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ शहरातील प्रमुख रस्ते व त्यावरील सिग्नल वगळता विविध ठिकाणी असलेल्या चौफुल्याही अपघातास कारणीभूत ठरत आहेत़ मात्र, किरकोळ अपघात होत असल्याने याकडे लक्ष दिले जात नाही़ लोकमतने ३ जुलैपासून सुरू केलेल्या अॅक्सिडेंट जंक्शन या मालिकेद्वारे अशा चौफुल्यांचा शोध घेत अपघाताची कारणे तसेच उणिवांवर प्रकाशझोत टाकला़ बहुतांशी चौफुल्यावरील अपघाताची कारणे ही वेगमर्यादेचे उल्लंघन, रस्ते निर्मितीनंतरच्या असुविधा, वाहतूक नियमांची पायमल्ली अशी विविध कारणे समोर आली़ तसेच काही ठिकाणी गतिरोधक तर काही ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले़ शहर वाहतूक शाखेने शहरातील प्रत्येक अपघाताची माहिती डिजिटलाइज केली आहे़ लोकमतने सुरू केलेल्या मालिकेतही अपघात झालेल्या व होण्याची दाट शक्यता असलेल्या चौफुल्यांचा वेध घेऊन त्याबाबतची कारणमीमांसा करण्यात आली होती़ या मालिकेच्या माहितीचा वाहतूक शाखेस उपयोग होणार आहे़ या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी आवश्यकतेनुसार सिग्नल यंत्रणा, पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती वा उपाययोजनांबाबत अहवाल तयार करून संंबंधित यंत्रणांसोबत पत्रव्यवहार वा उपाययोजना केल्या जाणार आहेत.शहरातील अपघातप्रवण चौफुलीगंगापूर रोडजवळील इंद्रप्रस्थ चौक, मुंबई नाका सर्कल, रविवार कारंजा सर्कल, कॉलेजरोडवरील प्रा़ टी.ए़ कुलकर्णी चौक, मॉडेल चौक, सारडा सर्कल, द्वारका सर्कल, वडाळा नाका चौक, इंदिरानगरमधील सार्थक चौक, मखमलाबाद नाका चौफुली, ड्रिम कॅसल चौफुली, तारवालानगर चौफुली, मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रा चौफुली, कोणार्कनगर चौफुली, आडगाव नाका चौफुली, सिडकोतील राणेनगर चौफुली, विहितगाव लॅमरोड चौफुली या अपघातप्रवण आहेत.
धोकादायक चौकांबाबत वाहतूक शाखेकडून उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:53 AM