राष्ट्रीय महामार्ग : चार सब-वे, उड्डाणपुलावर प्रवेश
नाशिक : पाच महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या कामांना येत्या महिनाभरात प्रारंभ करण्यात येणार असून, यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढलेल्या सुमारे ६६ कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी मिळून कार्यारंभ आदेश देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याची बाब सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल उभारणीनंतर निदर्शनास आली आहे. विशेष करून लेखानगर, इंदिरानगर, मुंबई नाका, द्वारका चौक, के. के. महाविद्यालय, जत्रा हॉटेल या भागात वाहतूक खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडून लहान-मोठे अपघातही घडले. मुख्य रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतुकीवरही होत असल्यामुळे मोठी डोकेदुखी झाली होती. लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून तात्पुरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते फोल ठरले. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते त्याठिकाणी भुयारी मार्ग करण्याचे ठरविण्यात आले. के. के. वाघ महाविद्यालयापासून ते जत्रा हॉटेलपर्यंत उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात येऊन त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. या सर्व कामांचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नोव्हेंबर २०१६ मध्ये करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामांच्या निविदा काढल्या असत्या शहरातील पंचवटी महाविद्यालय, स्टेट बॅँक चौक, कमोदनगर या ठिकाणी भुयारी मार्गासाठी निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, येत्या महिनाभरात कामाला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)
उड्डाणपुलावर चढ-उताराची सोय
सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचा शहरवासीयांकडून अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी या पुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी सोय करण्यात येणार आहे. सदर कामदेखील महिनाभरात सुरू होणार असून, त्यात जुन्या सिडकोतील स्टेट बॅँक चौकातील रस्त्यावरून थेट उड्डाणपुलावर प्रवेश करण्याची सोय होणार आहे. त्याचबरोबर द्वारकेकडून येणाऱ्या उड्डाणपुलाला स्प्लेंडर हॉलच्या समोर उतरण्याची सोय असेल, तर मुंबईकडे जाण्यासाठी हॉटेल सेवन हेवन समोरून समांतर रस्त्याने थेट मुख्य रस्त्यावर दाखल होण्याची सोय केली जाणार आहे. या उपाययोजनांमुळे उड्डाणपुलाच्या समांतर रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.