सिडको : पवननगर परिसरातील आदर्शनगरमध्ये नळावाटे पक्ष्यांच्या मांसाचे तुकडे आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि़२९) घडला़ पवननगरमधील जलकुंभाचे झाकण उघडे असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, या प्रकाराबाबत नागरिकांनी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या उपअभियंत्यांना बोलावून पवनगरमधील जलकुंभ तसेच परिसरातील नागरिकांच्या टाक्यांची साफसफाईची मोहीम राबविली़सिडकोच्या पवननगर परिसरातील आदर्शनगरमध्ये काही नागरिकांच्या नळाद्वारे पक्ष्यांच्या मांसाचे तुकडे आल्याचा प्रकार सोमवारी घडला़ यामुळे दूषित पाण्यामुळे संतापलेले नागरिक नगरसेवक बडगुजर यांच्याकडे गेले व त्यांनी कैफियत मांडली़ यानंतर महापालिकेचे उपअभियंता संजय बच्छाव हे घटनास्थळी आले व त्यांनी या परिसरातील टाक्यांची पाहणी केली़ काही टाक्यांमध्ये हे मांसाचे तुकडे आढळल्याने त्या साफ करण्यात आल्या़दरम्यान, या दूषित पाण्याची सखोल चौकशी केली असता पवननगर परिसरातील जलकुंभाचे झाकण उघडे असल्याने त्यामध्ये पक्षी मरून पडल्याचे आढळून आल्याचे दिसून आले़ या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी केली आहे़ (वार्ताहर)
पवननगर भागात नळावाटे आले मांसाचे तुकडे
By admin | Published: August 30, 2016 2:07 AM