नाशिक : गेल्या दशकभरापासून रखडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागणार असून, नवीन वर्षात २०२१ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळून विद्यापीठ आवारात विविध विद्याशाखांचे आणि अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू होणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण आणि सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतर, ऑनलाइन विद्यापीठ अधिसभेत दि. २२ डिसेंबर, २०२० लाही त्यांनी याविषयी दुजोरा दिला असून, मंत्रिमंडळाची अंतीम मान्यता मिळताच, २०२१ मध्ये नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठाचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. विद्यापीठात शिक्षणाबरोबर संशोधन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात विविध आरोग्य विद्याशाखांचे महाविद्यालयाची कार्यवाही जलदरीत्या व्हावी, यासाठी सरकारकडून जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
इन्फो -१
१) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ केवळ पुस्तकी ज्ञानापुरते न राहता ते प्रयोगशील व्हावे, यासाठी विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय, आयुर्वेद, युनानी, सिद्धा, योगा यांसारख्या वेगवेगळ्या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण व संशोधनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.
२)गेल्या दशकभरापासून रखडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर, नाशिक महापालिका व जिल्हा प्रशासनालाही जागेच्या संदर्भात तयारी करण्यासाठी सूचित करण्यात आल आहे.
इन्फो-२
नवीन वर्षाच पायाभरणी
कोरोनाच्या काळात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डॉक्टर, नर्सेस घडविण्यासोबतच व्हेंटिलेटर तज्ज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ यांसारखे तांत्रिक सहायक घडविण्याची गरजही प्रकर्षाने समोर आली. त्यामुळे नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करताना तांत्रिक सहायकांच्या प्रशिक्षणाची सोयही येथे करण्यात येणार आहे. विद्यापीठ आवारात विविध आरोग्य शाखांची महाविद्यालये व्हावीत, अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार, विद्यापीठात नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित असून, नवीन २०२१ वर्षात विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालयाची पारायभरणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.